दासगावातील दरडग्रस्‍तांचा तपस्‍यावर विश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दासगावातील दरडग्रस्‍तांचा तपस्‍यावर विश्‍वास
दासगावातील दरडग्रस्‍तांचा तपस्‍यावर विश्‍वास

दासगावातील दरडग्रस्‍तांचा तपस्‍यावर विश्‍वास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६: एका बाजूला सावित्री नदी तर दुसऱ्या बाजूला दौलतगडाच्या तीव्र उतारावर वसलेले महाड तालुक्यातील दासगाव हे दरडग्रस्त गाव, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. उन्हाळात पाणीटंचाई तर पावसाळ्यात पूर आणि दरडीचा सामना कराव्या लागणाऱ्या दासगावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी २४ वर्षाचे एक नवे नेतृत्व सज्ज झाले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तपस्या जंगम ही तरुण सरपंच म्हणून विजयी झाली आहे.
मतदारांमधून थेट सरपंच म्हणून निवडून आलेली तपस्या आपल्‍या गावावरील समस्यांचे डोंगर बाजूला करू पाहत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तपस्याच्या आई सुषमा दासगाव ग्रामपंचायतीच्या दहा वर्ष सदस्या होत्या, तर वडील महेंद्र जंगम हे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. महाविकास आघाडीकडून मिळालेल्या संधीतून तपस्या जंगम यांनी शिंदेगटाच्या श्रावणी पाटील यांचा ३७५ मताधिक्याने पराभव केला.
सरपंच पदावर बसल्यानंतर गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तपस्या जंगम सांगतात. याच परिसरात दरडग्रस्तांचे पुनर्वसनासाठी गणेशनगर हे गाव वसवण्यात आले आहे. तेथेही नागरी सुविधांची वाणवा आहे. रस्ते, पाणी आणि दरडीपासून सुरक्षांवर उपाययोजना करण्यावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
२००५ मध्ये दासगावावर दरड कोसळून अनेकजण मृत्यूमुखी पडले होते. दरडीपासून बचावात्मक उपाययोजनांवर त्यांचा भर द्यावा आहे. सध्या तपस्‍या राज्यातील आदर्श ग्रामपंचायतींचा अभ्यास करीत आहेत. भास्करराव पेरेंची पाटोदा ग्रामपंचायत त्यांना आदर्शवत वाटते, तर राजकारणात रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदर्श आहेत.

गावाच्या विकासाला प्राधान्य
खाद्य पदार्थ बनवण्याची आवड असलेल्या तपस्यांनी २०२० मध्ये मुंबई विद्यापीठातून हॉटेल व्यवस्‍थापनाची पदविका शिक्षण घेतल्यानंतर रवाळे येथील एका कंपनीत दीड वर्ष नोकरी केली, त्यानंतर एका युट्युब चॅनलमध्ये नोकरी करीत असताना गावकऱ्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आग्रह धरताच करिअर सोडून गावच्या विकासासाठी धावून आल्‍या. राजकारणातून आपण गावचा विकास साधू शकतो, असे या तरुणीला विश्वास वाटत आहे.