कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

sakal_logo
By

अलिबाग, ता. २९ (बातमीदार) : कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट बीएफ ७ चा प्रसार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचा धोका लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. याबाबत जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये रंगीत तालीम घेण्यात आली. या तालमीच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज असल्याचे दाखवण्यात आले.
एक वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. जगातील विविध देशात कोरोनाने थैमान घातले आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भारतातही कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट बीएफ ७ चा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. या नव्या व्हायरसचा धोका लक्षात घेता रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ नये. प्रसार वाढू नये, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडिसिन सुविधा सुसज्ज असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपासून रंगीत तालिम सुरू आहे. रंगीत तालीम झालेल्या आरोग्य संस्थांमधील रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडिसिन सुविधा इत्यादी बाबतची माहिती covid१९.nhp.gov.in या पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे.

साधन सुविधांचा साठा
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे आयसोलेशन बेड ७९१, ऑक्सिजन बेड ६९५, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड १५७ उपलब्ध आहेत. औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.