सिमेंटच्या जगात शेणाची जमीन तग धरून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिमेंटच्या जगात शेणाची जमीन तग धरून
सिमेंटच्या जगात शेणाची जमीन तग धरून

सिमेंटच्या जगात शेणाची जमीन तग धरून

sakal_logo
By

अलिबाग, ता. ५ (बातमीदार) : शहरी भागासह ग्रामीण भागात विकासकामांना गती येऊ लागली आहे. सिमेंट काँक्रीट, पेव्हर ब्लॉक बसवले जात आहेत. घरासमोरील अंगण, रस्ता अशा अनेक ठिकाणीही सिमेंट काँक्रीट व पेव्हर ब्लॉकचा वापर सर्रासपणे होत आहे. मात्र, या सिमेंटच्या जगतामध्ये आजही शेणाने सारवलेली जमीन काही ठिकाणी तग धरून आहे. त्यामुळे गावपण आजही टिकून आहे.
गावातील कौलारू घरे, घरासमोर शेणाने सारवलेली जमीन याचे आकर्षण काही वर्षांपूर्वी प्रचंड होते. सारवलेल्या जमिनीवर रात्री उन्हाळ्यात झोपणे, त्यात घरातील मंडळी, मित्रमंडळींसोबत गप्पा गोष्टी करणे हा आनंददेखील वेगळा होता. पावसाळा संपल्यावर दिवाळीपूर्वी गावांमध्ये बुरूम मातीसह शेणाने तयार जमीन केली जात होती. पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास जमिनीला मजबूत करण्यासाठी चोपण्याचा वापर केला जात होता. त्यामध्ये घरातील बच्चे कंपनीसह महिला, मोठी मंडळी एकत्र येऊन शेणाचे अंगण तयार करण्याचे काम करत होते. त्याच अंगणात चटई टाकून एकत्रित बसून गप्पा गोष्टी करणे, खेळणे हा प्रकार दिसून येत होता. परंतु, जिल्ह्यामध्ये वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या राहणीमानात बदल होऊ लागला आहे. शेणाने सारवलेल्या अंगणाची जागा आता सिमेंट काँक्रीटसह पेव्हर ब्लॉकने घेतली आहे. त्यामुळे शेणाने सारवलेली जमीन गावांमध्ये फारसी दिसून येत नाही.
वेगवेगळ्या विकासकामांमुळे गावांमध्ये पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीटचे अंगण दिसू लागले आहेत. मात्र, या सिमेंटच्या जगतामध्ये आजही काही गावांमध्ये बुरुम, माती व शेणाने जमीन तयार केली जात आहे. गावांमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारची जमीन आजही तग धरून असल्याने गावांमधील गावपण टिकून ठेवण्याचे काम दिसून येत आहे.

सारवलेल्या जमिनीचा आनंद कमी
ग्रामीण भागांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरण प्रचंड वाढू लागले आहे. गावागावात, गल्ली बोळ्यात सिमेंट काँक्रीटीकरणासह पेव्हर ब्लॉकचे जाळे प्रचंड पसरले आहेत. त्यामुळे माती, शेणाने तयार केलेल्या अंगणात बसण्याचा आनंद घेता येत नाही. हा आनंद हळूहळू कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या सिंमेट पेव्हर ब्लॉकचे अंगण तयार करतात; परंतु त्याने जमिनीत गारवा जाणवत नाही. बुरूम मातीने तयार केलेली आणि शेणाने सारवलेल्या जमिनीत गारवा कायम राहतो. तर सिमेंट कॉक्रीटीकरणामुळे उष्णता वाढते. त्याचा शरीराला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे आजही शेणाने सारलेले अंगण तयार केले जातात.
- जयदास ठाकूर, महाजने गाव