
सागरगडावर विजय महोत्सव
अलिबाग, ता. ७ (बातमीदार) ः जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून शनिवारी सागरगड विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. सागरगडावर अखंडित गडसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या दुर्गरक्षक सामाजिक संस्थेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
१३ जून १६६५ मध्ये पुरंदर तह झाला. या तहामध्ये शिवाजी महाराजांनी सागरगड मुघलांना दिला होता. तो शिवाजी महाराजांनी १६७९ मध्ये मुघल सरदार हैबतखान यांच्याकडून जिंकून घेतला. यावेळी स्वतः महाराज सागरगडावर उपस्थित होते. त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवारी (ता.५) सागरगडावरील बालेकिल्ल्यात मशाली पेटवून महोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी गडदेवतांचे व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण गडावर फिरवण्यात आली. त्यानंतर पालखी गडावरील शिवस्मारकाजवळ आणल्यानंतर शिवास्तुती गाऊन व आरती म्हणून सागरगड विजय महोत्सवाची सांगता करण्यात आली.