अलिबाग तहसीलचा वेग मंदावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग तहसीलचा वेग मंदावला
अलिबाग तहसीलचा वेग मंदावला

अलिबाग तहसीलचा वेग मंदावला

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) : मीनल दळवी यांच्यानंतर अलिबाग तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून विशाल दौंडकर यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले दौंडकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. अतिरिक्त भार असल्याने दौंडकर यांना पूर्ण वेळ अलिबाग तहसील कार्यालयाला देता येत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. कामावरही त्याचा परिणाम होत असून कामकाज मंदावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अलिबाग तहसील कार्यालयाला पूर्ण वेळ तहसीलदाराची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद, जिल्हापुरवठा अधिकारी अशी वेगवेगळी कार्यालये आहेत. तसेच अलिबागमध्ये तालुक्याचे तहसील कार्यालयही कार्यरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अलिबागमधील सरकारी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त वर्दळ नेहमी असते. या आधी अलिबाग तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून मीनल दळवी होत्या. परंतु त्यांना लाचप्रकरणी अटक केल्यानंतर हे पद रिक्त झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागात कार्यरत असलेले तहसीलदार विशाल दौंडकर यांच्याकडे अलिबाग तहसील कार्यालयातील भार सोपवण्यात आला. १० डिसेंबरपासून विशाल दौंडकर या कार्यालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. अलिबाग तहसील कार्यालयाला महिनाभरापासून पूर्ण वेळ तहसीलदार नसल्याने त्याचा ताण कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांवर पडत आहे. पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने कामाचा वेगही मंदावल्याची चर्चा तहसील कार्यालयात सुरू आहे. जिल्ह्याचे ठिकाण असतानाही अलिबाग तहसील कार्यालयाला पूर्ण वेळ तहसीलदार देण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासन अलिबाग तहसील कार्यालयाला पूर्ण वेळ तहसीलदार कधी देणार? याकडे नागरिकांसह कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
---------------
अलिबाग तहसील कार्यालयात पूर्ण वेळ तहसीलदारांचे पद रिक्त असल्याबाबत सरकारला माहीत आहे. अलिबाग तहसीलदारांची नियुक्ती करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. लवकरच ही नियुक्ती होणार आहे.
- डॉ. महेंद्र कल्याणकर,
विभागीय आयुक्त, कोकण भवन