
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा
पाली, ता. १० (वार्ताहर) ः शहरात बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. नवीन वर्षातील पहिला अंगारक योग असल्याने दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ होती.
रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यभरातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व वाहने दाखल झाल्याने शहरात मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. गर्दी वाढल्याने दुकानदार व हॉटेलचा व्यवसाय तेजीत होता.
बल्लाळेश्वर मंदिर व सभागृहाला फुलांची आरास, आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मंदिराला विद्युत रोषणाई देखील केली होती.
पहाटेपासूनच मंदिर परिसरातील दुकाने, लॉज, हॉटेल गजबजले होते. खेळण्याची व शोभिवंत वस्तू,नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद, पेढेवाल्यांकडे ग्राहकांची गर्दी होती. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान समितीच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
वर्षातील पहिली अंगारक संकट चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवसायही चांगला झाला.
मनोज मोरे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर देवस्थान