धुक्‍यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुक्‍यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम
धुक्‍यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम

धुक्‍यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम

sakal_logo
By

पाली, ता. १२ (वार्ताहर) ः जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे. गुरुवारी सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याची चादर पसरल्‍याने राष्‍ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतूक धीम्‍या गतीने सुरू होती, असे असले तरी या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक व प्रवासी आनंद घेत आहेत.
जिल्ह्यातून मुंबई-गोवा तसेच मुंबई-बंगळूर हे दोन महत्त्वाचे महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुख्य शहरांना व गावांना जोडणारे राज्य मार्गही जातात. सध्या तापमानाचा पारा घसरला असून पहाटेच्या वेळी दाट धुके आणि धुरक्‍यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. धुक्यामुळे गुरुवारी दृश्‍यमान कमी झाले होते. चालकांना रस्ता व समोरील वाहने नीट दिसत नसल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. परिणामी काही ठिकाणी सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्‍याचे दिसले.

मुंबई गोवा महामार्गावर धोका
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच धुक्यामुळे रस्त्यावरील दुभाजक, खड्डे, फलक, माती-दगड, खडी व रस्त्यावर उभी असलेली वाहने नीट दिसत नाहीत. त्‍यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघाताचा धोका संभवतो.

प्रवासी, पर्यटक आनंदित
धुक्यामुळे जिल्ह्यातील वातावरण खूप आल्हाददायक झाले आहे. प्रवासी, पर्यटक या धुक्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. सकाळी धुक्यातून फेरफटका मारण्याची मजाच काही और असल्‍याचे प्रल्हाद सोनावणे या पर्यटकाने सांगितले.

महामार्गावर व रस्त्यांवर दाट धुके पसरल्याने वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे वाहन संथगतीने चालवावे लागते. अचानक समोर काही आल्यास अपघाताचा धोका संभवतो.
- सुशील शिंदे, प्रवासी

.........................

माणगाव पारा १७ अंशाखाली
माणगाव, ता. १२ (बातमीदार) ः लांबलेल्या पावसाने ऋतू चक्रावर परिणाम होऊन थंडी व धुके गायब झाले होते. मात्र जानेवारी महिना सुरू होताच थंडीची चाहूल लागली आहे. रब्बी पिकासाठी हे वातावरण पोषण असून दर्जेदार पीक येईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे.
तालुक्‍यातील तापमान १७ अंश सेल्सिअसवर असून सकाळी दाट धुके व सुखद गारवा जाणवू लागला आहे. सध्या कडधान्य शेतीला पूरक असे वातावरण असल्‍याने शेतकरीही समाधान व्यक्त करीत आहेत. थंडीची चाहूल लागताच गावोगावी शेकोटी पेटवल्‍या जात असून आबालवृद्ध शेकोटीचा आनंद घेताना दिसत आहेत.