
अलिबागमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण
अलिबाग, ता. ७ (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषदेच्या वावे येथील शाळेच्या पटांगणात जय शोतोकान कराटे अँड स्पोर्ट ॲकॅडमी या संस्थेच्या वतीने एक महिना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १२३ मुलांनी सहभाग घेतला होता. या वेळी विद्यार्थ्याला प्रमाणपत्रही देण्यात आले. तसेच रोहन गुरव, तनया मंचेकर, वेदिका कवळे, सोनू कामी यांनी विद्यार्थ्यांना एक महिना मोफत कराटे प्रशिक्षण दिले. उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून रोहन अरुण गुरव यांचा मुख्याध्यापिका अमृता पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शालेय कराटे स्पर्धेत पदक मिळवल्याबद्दल महाजने येथील श्रमिका श्रीधर पाटील व रामराज येथील लायबा शेहजाद अन्सारी यांचा शाळा समितीचे अध्यक्ष विशाल अर्कशी तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक तुरे यांनी सत्कार केला. मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे शिकणे काळाची गरज आहे. खेळामुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक पातळी वाढते म्हणून मुलांनी खेळ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन अमृता पाटील यांनी केले.