कोकणातील नाचणीला सुगीचे दिवस

कोकणातील नाचणीला सुगीचे दिवस

महेंद्र दुसार, अलिबाग
कोकणातील दऱ्या-खोऱ्यात नाचणी, वरी या तृणधान्याचे पीक पूर्वी मुबलक प्रमाणात घेतले जायचे. कालांतराने आंबा, काजू पिकाखालील क्षेत्र वाढल्याने तृणधान्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले. तृणधान्याचे महत्त्व ओळखून पुन्हा या पिकाखालील क्षेत्र वाढवून आधुनिकता आणण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. सध्या पनवेलमध्‍ये जिल्हा कृषी महोत्सव सुरू असून महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना तृणधान्य (मिलेट) आणि त्यापासून तयार होणाऱ्या पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी नाचणी, वरीपासून बनवलेले विविध पदार्थांचे स्टॉल महोत्सवात मांडून सर्वसामान्यांना माहिती दिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, संयुक्त राष्ट्राने २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्त, डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष-२०२३ रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत वर्षभर विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले होते. याचेच प्रतिबिंब रायगड जिल्हा कृषी महोत्सवात दिसत असल्‍याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात आंबा आणि काजू लागवडीला प्रोत्साहन मिळण्यापूर्वी नाचणी, वरी या तृणधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. अपार मेहनत आणि अल्प मोबदल्‍यामुळे हे क्षेत्र घटत जेमतेम २ हजार हेक्टरपर्यंत आले होते. मात्र अलिकडच्‍या काळात यात समाधानकारक वाढ झाली असून वरीखाली ३७२ आणि नाचणी ३,६४२ हेक्‍टर इतके क्षेत्र लागवडीखाली आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, महिला बचतगट, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्ह्यात महिनानिहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय, लागवड पद्धती, ग्राम कृषी सभेमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत चर्चा व मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्य प्रक्रियाबाबत प्रशिक्षण, आहार तज्ज्ञांशी संवाद, विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन, महिला बचतगटांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाट्य इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते.

महोत्‍सवात वरी, नाचणीची बाजी
नाचणी, वरीचे पीक मुख्यतः आदिवासी कुटूंब घेतात. वर्षभर पुरेल इतके धान्‍य घरात ठेवून उर्वरित विकतात. या धान्याला चांगली किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न महोत्सवातून कृषी विभागाचा आहे. वर्षभर राबवलेल्या उपक्रमाने त्यांचाही उत्साह वाढला असून इतर धान्यांच्या स्पर्धेत कोकणातील डोंगर- दऱ्यात पिकणाऱ्या नाचणी-वरीनेही बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

कुपोषण मुक्तीसाठी मिलेटचा आधार
कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी मिलेटचा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे, त्यांची लागवड वाढविणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती केली जात आहे. नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करून बनविता येतात. अशा पदार्थांचा आहारात समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने शाळांमध्ये पालकांना माहिती देण्यात आली.

आरोग्यासाठी पोषक
तृणधान्याच्या वापरातून मिळणारे आवश्यक पोषकांश-मिलेट्स किंवा पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य हे शरीरातील आम्लता कमी करणारे असून, ते ग्लुटेन विरहित, अत्यंत पोषक आणि पचनास सुलभ आहेत. मिलेट्सचा ग्लासेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर संतुलित राखण्याचे कार्य तृणधान्य करतात. आहारातील यांच्या वापरामुळे वजन कमी होण्यास मदतच होते. कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी महत्त्वाची शरीरासाठी आवश्यक घटक द्रव्ये याच्यातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आवश्यक तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स, फॉलिक सिड, विटामिन बी ६, बीटा कॅरोटीन, बी १ आणि चेतातंतूंचे कार्य अधिक सक्षम बनविण्यास लागणारे लेसिथिन तृणधान्ये किंवा मिलेट्समधून मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com