दोन दिवसांत १६ हजार बालकांची चिकित्‍सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसांत १६ हजार बालकांची चिकित्‍सा
दोन दिवसांत १६ हजार बालकांची चिकित्‍सा

दोन दिवसांत १६ हजार बालकांची चिकित्‍सा

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ (बातमीदार) ः बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ मोहितेंतर्गत शालेय स्‍तरावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत सुमारे चार लाख ६१ हजार बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तर अवघ्‍या दोन दिवसात १६ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या १६ लाख ६४ हजार असून १,८०० गावांचा समावेश आहे. रुग्‍णांवर उपचारासाठी ५४ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५४ उपकेंद्र आहेत. या आरोग्य संस्थामार्फत ग्रामीण भागात डोंगर दऱ्यात, गावे, वाड्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील उपकेंद्रामध्ये सामुदायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तेरा प्रकारच्या आजारांची तपासणी करून नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. एनआरएचएम मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुदृढ बालक मोहीम सुरू करण्यात आली असून त्‍यासाठी २५७ पथके तयार केली आहेत. पथकांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील ३० वैद्यकीय अधिकारी, १६१ समुदाय आरोग्य अधिकारी, ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी आणि शाळांना भेट देऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यात दोन हजार ५२८ शासकीय, ३८५ निमशासकीय आणि २४६ खासगी शाळांमधील तीन लाख २१ हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच तीन हजार ५९ अंगणवाड्या आणि ७२ खासगी नर्सरीमधील एक लाख ४० हजार बालकांची तपासणी होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीवर महत्त्‍वाची
आजारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बालकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभागांनी मोहिमेच्या कालावधीत जास्तीत जास्त बालक, विद्यार्थी अंगणवाडी शाळेत हजर राहतील, याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले आहेत. बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, दाताचे विकार, डोळ्याचे विकार, तिरळेपणा, दुभंगलेले ओठ, हाडाचे व्यंग, जीवनसत्त्व कमतरता आदी आजाराचे निदान आणि उपचार होणार आहेत. आवश्यकतेनुसार मोफत शस्‍त्रक्रियाही होणार आहेत. पालकांनी मोहिमेत सहभागी होत बालकांची तपासणी करून घ्यावी.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

................


नेणवली शाळेत औषध वाटप
पाली, ता. १२ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील रायगड जिल्‍हा परिषदेच्या नेणवली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अधिकारी डॉ. निर्मल व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अभियानाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी अंगणवाडीतील बालकांना व शालेय मुला-मुलींना समुपदेशन, आरोग्य तपासणी व मोफत उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक औषध गोळ्यांचे वाटप वयोगटानुसार करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबिके, गणपत वरगडे व आशा सेविका या वेळी उपस्थित होते.

पाली ः विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.