
सावत्र बापामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर
अलिबाग, ता. १३ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली होती. हे कृत्य लपवण्यासाठी मुलीच्या आईने कुरूळ गावातील अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार केली होती. मात्र अलिबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे खऱ्या आरोपीपर्यंत पोहचण्यास यश आले. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पुणे येथील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या सतत पोटामध्ये दुखत होते. खासगी रुग्णालयात उपचारानंतर तात्पुरत्या स्वरूपात पोटात दुखणे थांबले जात होते. त्यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. पुण्यातील सरकारी दवाखान्यात उपचार केल्यावर ती साडेसात महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी सतर्कता दाखवत पुण्यातील दत्तवाडी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी मुलीच्या आईला विचारणा केली असता रायगड जिल्ह्यातील कुरूळ येथील अल्पवयीन मुलापासून ती मुलगी गरोदर असल्याची तक्रार केली. फिरायला नेत एका खोलीमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले होते. त्यानुसार दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार करून पुढील तपासासाठी अलिबाग पोलिस ठाण्याकडे पाठवण्यात आली होती.
संशयित मुलगा निर्दोष
अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस यांनी उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांच्याकडे तपास वर्ग केला. कुरूळ येथील संशयित मुलाची चौकशी करत त्याच्या शाळेमध्ये जाऊन विचारपूस केली. मात्र त्या मुलाचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे कावळे यांच्या मनात मुलीचा सावत्र वडीलच गुन्हेगार असल्याचा संशय निर्माण झाला. दत्तवाडी पोलिसांना ही माहिती देत मुलीच्या सावत्र वडिलांना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांची मदत घेतली.
पैशांच्या आशेने सत्याचा उलगडा
अर्थसाह्य मिळणार असल्याचे भासवून पोलिसांनी सावत्र वडिलांसह मुलीच्या आईला विश्वासात घेतले. त्यांना अलिबागमध्ये बोलावण्यात आले. अलिबाग पोलिस ठाण्याचे शिपाई महेंद्र इंगळे अर्थसाह्य अधिकारी बनले. त्यांनी मुलीच्या आईला विश्वासात घेतल्यावर ती सत्य बोलू लागली. या गुन्ह्यात तिच्या पतीचाच समावेश असल्याचे सांगितले. अखेर तिने मुलीला न्याय देण्यासाठी पतीविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार केली.
घरात कोणी नसताना अत्याचार
मनोज लक्ष्मण काते याचे दुसरे लग्न झाले होते. त्या महिलेला पहिल्या लग्नापासून दोन मुली होत्या. त्यात एक आठ आणि दुसरी तेरा वर्षांची आहे. मनोजपासून दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी झाली. पीडित मुलगी तिची आई व सावत्र वडील व दोन बहिणी असे पाचजण कुरूळ येथील एका नातेवाईकांकडे एप्रिल महिन्यामध्ये आले होते. त्याच ठिकाणी भाड्याने राहून मुलीची आई चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कामगार; तर सावत्र वडील रंगकाम करीत असत. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत सावत्र वडील मुलीवर अत्याचार करत होते. कोणाला सांगितले, तर मारण्याची धमकी देत होते, असे तपासात समोर आले. पुण्यात परत गेल्यावर मुलीच्या पोटात दुखत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.