बिघडलेल्या वीज मीटरचा ग्राहकांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिघडलेल्या वीज मीटरचा ग्राहकांना फटका
बिघडलेल्या वीज मीटरचा ग्राहकांना फटका

बिघडलेल्या वीज मीटरचा ग्राहकांना फटका

sakal_logo
By

अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये ४८ हजार वीज मीटर तांत्रिक बिघाड झाला आहेत. अनेकांना सरासरी वीजबिल येत असल्‍याने ग्राहक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मीटरची मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती सध्या अनेक तालुक्‍यांत आहे. त्‍यामुळे बिघडलेल्‍या मीटरचा फटका ग्राहकांना बसतो आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस औद्योगिकरण, नागरिकीकरण वाढत आहे. त्यात जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असल्याने विजेची गरज वाढली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख ८० हजार वीजग्राहक आहेत. त्यामध्ये घरगुती, वाणिज्य व औद्योगिक जोडण्यांचा समावेश आहे.एकूण ८०९ ग्रामपंचायती असून एक हजार ८६४ गावे आहेत. या गावांना महावितरण कंपनीद्वारे सुमारे दोन हजार ९०० पथदिव्यांचे वीज जोडणी देण्यात आले आहे.
विजेचा वापर वाढल्याने मीटरची मागणीदेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
नवीन जोडणीसाठी दर महिन्याला सुमारे तीन हजार मीटरची गरज आहे. वेगवेगळ्या कंपन्यांतील मीटर विक्रीची दुकानेही जिल्ह्यात सुरू आहेत. या दुकानांत दीड हजार रुपयांपासून दोन ते तीन हजार रुपयांपर्यंतचे मीटर विकत घेतले जात आहेत. परंतु जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मीटर बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन चार वर्षातच मीटर नादुरुस्‍त होण्याच्या तक्रारी वाढल्‍या आहेत.
जिल्‍हाभरात सध्या ४८ हजार मीटर बिघडलेले आहेत. बिघडलेले मीटर बदलण्यासाठी ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आहे. मात्र महावितरण कार्यालयातच मीटरचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात ३० हजार मीटरची मागणी आहे.
जिल्ह्यात एका बाजूला नवीन वीज जोडणीची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला बिघडलेल्या मीटरच्या तक्रारी वाढल्‍या आहेत. त्यामुळे महावितरणला मीटर पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. ज्या ठिकाणी विजेचा वापर अधिक आहे, त्याठिकाणी नादुरुस्‍त मीटर तत्काळ बदलेले जातात. परंतु अन्य ठिकाणी जसे मीटर उपलब्ध होतील, त्यानुसार ते उपलब्‍ध करून दिले जात आहेत. यात नवीन वीज जोडणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बिघडलेले मीटर बदलून मिळण्यास अनेक महिने ग्राहकांना वाट पाहावी लागते.


जिल्ह्यातील ग्राहकांसाठी मीटरची मागणी करण्यात आली आहे. जसा पुरवठा होतो. त्याप्रमाणे मीटर ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नादुरुस्‍त मीटरचे बिल सध्या वीज वापराच्या प्रमाणानुसार, सरासरीत दिले जात आहे.
- आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता
महावितरण कंपनी, रायगड