वारली चित्रकलेचे पंतप्रधानांकडून कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारली चित्रकलेचे पंतप्रधानांकडून कौतुक
वारली चित्रकलेचे पंतप्रधानांकडून कौतुक

वारली चित्रकलेचे पंतप्रधानांकडून कौतुक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : आदिवासी पाड्यात शेणा-मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर वारली चित्रकला हमखास दिसते. आदिवासी समाजाची लोकसंस्कृती या चित्रातून प्रतिबिंबीत होते. कधी तारफ्याच्या संगितावर रंगलेला नृत्याचा फेरा, उखळीवर धान्याचे कांढण, सुपामध्ये धान्य पाखडणाऱ्या महिलांचे चित्र मनाला सहज भावतात. वारली चित्रकलेला बाजारपेठ असली तरी आदिवासी पाड्यावरील तरुण बाजारपेठेतील स्पर्धेतून मागे पडताना दिसतात; परंतु अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथील श्री समर्थ पुरुष बचतगटाने यात बाजी मारली आहे. या बचतगटाने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले.

सध्या दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडीयम येथे ‘आदि महोत्सवात’ सुरू आहे. महोत्सवात या बचतगटाने सहभाग घेतला असून दत्ता नाईक हे बचतगटाचे अध्यक्ष आहेत. या बचतगटाने वारली चित्रकलेचा वापर करून विविध वस्तू तयार केल्या आहेत, त्‍यांना सर्वांचीच पसंती मिळत आहे.
परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम साधत दत्ता नाईक आणि त्यांच्या सहकार्यांनी वारली चित्रकलेचा वापर केला आहे. व्हॉलपीस, फ्लॉअर पॉट, रुमाल, महिलांचे पोषाख, पुरुष आणि महिला दोघेही वापरू शकतील, असे टी-शर्टवर त्यांनी वारली चित्रकला उतरवली आहे. काळा, लाल, तपकीरी रंगाच्या कॅनव्हॉसवर सफेद रंगाच्या लहानलहान कलाकृती आकर्षक दिसतात. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या दत्ता नाईक यांनी वारली चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या उपक्रमाला आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळवणेही शक्य झाले. जंगलभागात मिळणाऱ्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून बनवलेल्या या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळवणे, त्यांची विक्री करणे यासाठीही आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाचे पुरुष बचतगटाला सहकार्य मिळाले.

तीन लाखांचे अनुदान
वस्तू निर्मिती करण्यासाठी न्यूक्लिअर बजेट योजनेंतर्गत ३ लाख अनुदान मंजूर केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट झाल्याने दत्ता नाईक यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आभार मानले. अशा प्रकारच्या योजनांमध्ये भाग घेण्यासाठी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी आदिवासी समाजातील लोकांना आवाहन केले आहे.

वारली चित्रकलेचा प्रवास
- महाराष्ट्रात विशेषत: पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर दादरा-नगर हवेली यासारख्या भागात वारली चित्रकला आढळते.
- नाशिक आणि धुळे या भागातही वारली चित्रकलेचे अस्तित्व आहे. मात्र डहाणू आणि तलासरी परिसर वारलीचे केंद्रस्थान मानले जाते.
- रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूर, पेण, सुधागड-पाली आणि अलिबाग तालुक्यातील आदिवासी पाड्यावर ही चित्रकला हमखास दिसून येते. ही कला महाराष्ट्रातील संस्‍कृतीचे, अस्मितेचा अविभाज्य भाग आहे.
- अलिबाग येथे येणाऱ्या पर्यटकांकडून पुरुष बचत गटांनी तयार केलेल्‍या वारली चित्रकलेच्या वस्‍तूंना चांगली बाजारपेठ मिळेल, अशी अपेक्षा दत्ता नाईक आणि बचत गटाच्या सदस्यांना आहे.