हर हर शंभो... शिव महादेव... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर हर शंभो... शिव महादेव...
हर हर शंभो... शिव महादेव...

हर हर शंभो... शिव महादेव...

sakal_logo
By

मंदिरात शिव शंभोचा जयघोष


अलिबाग, ता. १८ : तालुक्यातील ऐतिहासिक आवास येथील नागेश्वर आणि कनकेश्वर, काशी विश्वेश्वर मंदिरात भक्तांची पहाटेपासून गर्दी होती. मापगावातील डोंगरावर असलेल्या कनकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्ताने तालुक्यात अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण होते.
अलिबाग तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त बैलगाडी शर्यतीची परंपरा या वर्षी खंडित झाली आहे. याची कसर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने भरून काढण्यात आली. गावोगावी शंकर मंदिर परिसरात यात्रा भरल्‍या होत्‍या.
काशी वीश्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर कनकेश्वर मंदिराचा डोंगर चढताना ‘हर हर महादेव’चा गजर भाविक करीत होते. वेश्वीतील गोकुळेश्वर, गोरेगाव येथील त्र्यंबकेश्वर, पेणचे पाटणेश्वर, महलमिरा डोंगरावरील व्याघ्रेश्वर, महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. महाड येथील वीरेश्वर मंदिरात ओम नम:शिवाय, बम बम भोलेचा गजर सतत सुरू होता. मंदिराबाहेर पूजा साहित्‍याची दुकाने सजली होती.

................

पेशवेकालीन मंदिरात अलोट गर्दी
कर्जत (बातमीदार)ः तालुक्यातील तमनाथ येथे पेशवेकालीन शंकराचे मंदिर आहे. दरवषी महाशिवरात्रीला याठिकाणी यात्रा भरते. कोंदिवडे रस्त्यालगत असलेल्या उल्हास नदीपात्रालगत तमनाथ गावाच्या वेशीवरच पेशवेकालीन प्रसिद्ध असे शिवशंकराचे दगडामध्ये कोरलेले भव्य मंदिर आहे. सकाळच्या सत्रात अभिषेक, धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.
कर्जत ः पेशवेकालीन मंदिरात भाविक दर्शन घेतले.

...............

रसायनीत महाशिवरात्री उत्साहात
रसायनी, ता. १८ (बातमीदार) : रसायनी-पाताळगंगात परिसरातील शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दापिवली गावातील रसेश्वर मंदिरात देवस्थान विकास समितीच्या वतीने पहाटे चार ते सकाळी सहावाजेपर्यंत दुग्धाअभिषेक झाला. गुळसुंदेतील सिद्धेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, कराडे खुर्द येथील रामेश्वर मंदिर, घोसाळवाडी येथील खारेश्वर मंदिर तसेच वासांबे मोहोपाडा येथील शंकर मंदिरांत भाविकांनी गर्दी केली होती. चांभार्ली येथील वारकऱ्यांनी गुळसुंदे येथे सिद्धेश्वर मंदिरापर्यंत दिंडी काढली होती.

रसायनी ः गुळसुंदेतील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

......................

पुरातन भोगेश्वर मंदिरात गर्दी
मुरूड (बातमीदार) ः शहराच्या मध्यभागी वसलेले भोगेश्वर मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने आहे. शनिवारी सकाळपासूनच भक्‍तांनी बेलपत्र अर्पण करून, अषिभेक करून महादेवाचे दर्शन घेतले. काही शिवभक्तांनी मंदिर परिसरातील पुष्करणीतून कुंभ भरून स्वयंभू पिंडीवर जलाभिषेकही केला. याशिवाय श्रीक्षेत्रपाल, शिव मंदिर वावडुंगीतही पंचक्रोशीतील शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या. मंदिरांत रोषणाई, भजन-कीर्तनाचे आयोजन केले होते.