
हनी टॅपर पोलिसांच्या जाळ्यात
पाठलाग
प्रमोद जाधव, अलिबाग
मित्राच्या मदतीने सोशल मिडीयावर चॅटिंग करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिलेसह दोघांना नुकतीच मांडवा सागरी पोलिसांनी अटक केली.
अलिबाग तालुक्यातील आगरसुरेतील बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांशी पंधरा दिवसांपूर्वी एका महिलेने मोबाईलवर संपर्क साधला. जागा घेण्याच्या बहाण्याने त्या दोघांत संपर्क वाढला. मोबाईलवर चॅटिंग सुरू झाली. अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवून ती महिला व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जागा बघण्याच्या बहाण्याने २८ जानेवारीला त्यांचे मांडवा येथे भेटण्याचे ठरले. आवास परिसरात एका कॉटेजवर दोघे एकत्र थांबले. यावेळी महिलेने त्यांचे एकत्रित असतानाचे व्हिडीओ काढले. त्यानंतर काही दिवसांनी ते व्हिडीओ चित्रीकरण तिसऱ्या व्यक्तीला पाठवून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ व्हायरल होऊ नये, यासाठी व्यावसायिकाकडे पाच लाखांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाख रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी व्यावसायिकाने मांडवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार, अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस, मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे साहायक निरीक्षक राजीव पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक खाडे, पोलिस नाईक सुधीर पाटील, प्रशांत घरत आदींचे पथक तयार करण्यात आले. पथकामार्फत ब्लॅकमेक करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलचे लोकेशन सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने निश्चित करण्यात आले. ब्लॅकमेल करणारी व्यक्ती मांडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी सापळा रचून जेरबंद करण्यात आले.
ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीस पकडण्यासाठी पोलिसांनी पैशाचे एक पार्सल तयार केले. ते पैसे घेण्यासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला मुंबईतील चर्चगेट येथे बोलावण्यात आले. ज्या वेळेला पैसे देण्यात आले, त्यावेळी संबंधित महिला एका लहान मुलाला घेऊन आली होती. तिला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी दणका मिळाल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या माहितीवरून कामार्ले परिसरातून तिच्या साथीदारास ताब्यात घेण्यात आले.
धनश्री टावरे (३०, रा. माहीम, मुंबई) व संजय अरुण सावंत (४७ ) अशी दोघांची नावे आहेत. दोघांची दहा वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांनी श्रीमंतांना हेरून फसवणूक करण्याचा प्लॅन आखला.
पाणी व्यावसायिकांचीही फसवणूक
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पाणी व्यावसायिकांशी काही दिवसांपूर्वी एका महिलेने संपर्क केला. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. महिलेने व्यावसायिकाला नवखार येथील लॉजवर बोलावले व त्यांच्या भेटीचे चित्रीकरण केले. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे सात लाख उकळले. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
मुंबईत अनेक गुन्हे
संजय सावंत हा अलिबाग तालुक्यातील कामार्ले परिसरातील पत्नी व मुलासह राहतो. श्रीमंत व्यावसायिकांना हेरून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात तो पारंगत आहे. त्याच्याविरोधात अश्लील मेसेज व आयटीअॅक्टनुसार मुंबईत गुन्हा दाखल आहे. तसेच धनश्री हिने या पूर्वी मुंबईतील एका अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी केली होती. परंतु त्याने पैसे न दिल्याने त्याच्याविरोधात अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून समोर येत आहे.