पर्यटन क्षेत्रातील रस्ते चकाचक!

पर्यटन क्षेत्रातील रस्ते चकाचक!

पर्यटन क्षेत्रातील रस्ते चकाचक!
१०८ कोटींच्या कामांचा प्रस्ताव; पाच पुलांची होणार दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : अलिबाग बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अलिबाग, मुरूड, सुधागड आणि पेण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून पुरेसा निधी उपलब्ध झाला नव्हता, त्यामुळे येथील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. एकूण १२०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासह पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल १०८ कोटी रुपयांचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. निधी मंजूर झाल्‍यास येथील रस्ते सुस्थितीत येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.
अलिबाग, मुरूड तालुक्यातील मुख्य मार्गांसह जिल्हा मार्गांचीही दुरवस्था झाली आहे. पर्यटनस्थळांना जोडणारे असे ११३ प्रमुख जिल्‍हा, राज्‍य मार्ग असून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. कोरोना काळात रस्त्यांच्या दुरुस्तीस निधी उपलब्ध करून देण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अडचणी येत होत्या. जिल्हा मार्गांवरील जुन्या साकवांची २५ वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. याचा परिणाम दळण-वळणावर होत आहे. दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार वर्गाला या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसात नद्यांच्या प्रवाहात ते केव्हाही वाहून जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी अलिबाग-मुरूड मार्गावरील काशीद येथील पूल वाहून गेला होता, त्यामध्ये एका प्रवाशाला जीव गमवावा लागला होता. अलिबाग-रोहा मार्गावरीलही एक साकव पूल वाहून गेला होता. अशा प्रकारच्या घटना घडू नये, म्हणून नागरिकांच्या आग्रहास्तव अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी, पेण-सुधागडचे आमदार रवी पाटील यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील, अनिकेत तटकरे यांनीही कामे सुचवली आहेत. या सर्व कामांचा अहवाल तयार करून अलिबाग बांधकाम विभागाने राज्य शासनाला पाठवला असल्याने एप्रिलपासून कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.

मागील वर्षी रस्ते दुरुस्‍तीसाठी ६४ कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील काही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. रस्त्यांची दुरवस्था पाहून पुढील वर्षाकरीता जादा कामे सुचवण्यात आली आहेत. यात सर्वाधिक कामे अलिबाग-मुरूड तालुक्यातील आहेत.
- जे.एल. सुखदवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

अलिबाग-मुरूडमधील बहुतांश पूल नादुरुस्त झाले आहेत. वाढत्या रहदारीचा भार सांभाळण्यात ते सक्षम राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची वेळेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आहे.
- आमदार महेंद्र दळवी

---
रस्तेदुरुस्तीवरील दृष्‍टिक्षेप
दुरुस्तीचे टप्पे - १४४
एकूण लांबी- १२०० किमी
पुलांची संख्या- २४
पुलांसाठी निधी- ६ कोटी १२ लाख


मतदारसंघातील कामे
लोकप्रतिनिधी/ कामे/ अपेक्षित निधी
जयंत पाटील / २३/ २ कोटी ९५ लाख
रवी पाटील/५७/ १२ कोटी ३० लाख
महेंद्र दळवी/ ६६/ ९२ कोटी ७७ लाख
अनिकेत तटकरे /१/ १२ लाख
एकूण /१४७/ १०८ कोटी१६ लाख
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com