
अलिबागमध्ये २५ फेब्रुवारीला क्रीडा महोत्सव
अलिबाग, ता. २३ : युवा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि बी. यू. प्रोडक्शन यांच्या सौजन्याने अलिबाग क्रीडा महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग बीच मैदानावर २५ आणि २६ फेब्रुवारी या दोन दिवशी क्रीडा महोत्सवाचा थरार अलिबागकरांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती बी. यू. प्रोडक्शनचे उमेश कोळी यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करता यावी, यासाठी अलिबाग क्रीडा महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे हे पहिले वर्ष असल्याने यंदा मॅरेथॉन, सायकल स्पर्धा, कुस्ती, शरीरसौष्ठव आणि कबड्डी या पाच खेळांचा समावेश करण्यात आला आहे, असे कोळी यांनी सांगितले. अलिबाग क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. २५) करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेला रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता अलिबाग तालुक्यातील मल्लांच्या कुस्त्यांचा थरार अलिबाग बीच मैदानावर रंगणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ बांधकाम सभापती चित्रा पाटील, तपोनिधी अरविंदनाथ महाराज, जयेंद्र भगत आणि माजी नगरसेवक प्रदीप नाईक हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये नवोदित रायगड श्री चषक आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेला माजी आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, रघुजी राजे आंग्रे, संजय पाटील, उद्योजक राहुल पाटील, रोहन पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कोळी यांनी दिली.