पर्यावरणपुरक होळीचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपुरक होळीचा निर्धार
पर्यावरणपुरक होळीचा निर्धार

पर्यावरणपुरक होळीचा निर्धार

sakal_logo
By

अलिबाग,ता.२७ (बातमीदार)ः होळीच्या पार्श्वभूमीवर होणारी झाडांची कत्तल तसेच धुळीवंदनाला रासायनिक रंगांसोबत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील वन विभागासह विविध सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. याच अनुषंगाने सणाचे पावित्र जपताना गावागावात बैठकांसह समाजमाध्यमांवर देखील पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे.
होळीपाठोपाठ येणारा धुळीवंदनाचा सण अबाल वृद्धांपासून सर्वांच्याच आवडीचा असतो. रायगड जिल्ह्यामध्ये चार हजार पेक्षा अधिक ठिकाणी होळी उभारली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याचे वन विभाग आत्तापासूनच कामाला लागले आहे. याच अनुषंगाने गावागावात वन संयुक्त समितीच्या माध्यमातून बैठका सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच झाडांची कत्तल टाळून पर्यावरणाचा समतोल राखत होळी साजरा करा, अशा प्रकारचे आवाहन केले जात आहे. तसेच होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळीवंदन सणानिमित्त होणाऱ्या पाण्याचा अपव्यय तसेच रासायनिक रंग टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेसह वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना देखील पुढे आल्या असून ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, असे आवाहन केले जात आहे.
-----------------------------------------------------------
पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व
-वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस झाडांची सावली नष्ट होऊ लागली आहे. पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. उष्णता सतत जाणवत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
-वेगवेगळ्या रासायनिक रंगाच्या उधळणीने लहान थोरांच्या चेहऱ्याला इजा होण्याची भीती अधिक असते. त्यात डोळ्यांनाही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- होळीमध्ये पाण्याचा वापर प्रचंड केला जातो. अशातच जिल्ह्यातील अनेक धरणे, विहिरींमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या अति वापरामुळे टंचाई भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----------------------------------
होळी, धुळीवंदन सण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे. होळी साजरी करताना झाडांची कत्तल करू नये, यासाठी सोशल मिडियाबरोबरच गावागावात जाऊन जनजागृती केली जात आहे. तसेच धुळीवंदनाच्या दिवशी पाण्याची नासाडी करू नका आणि नैसर्गिक रंगाचा वापर करा, असा याबाबत जनजागृती केली जात आहे.
-नितीन राऊत, राज्य पदाधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
---------------
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी गावागावात बैठका सुरु करण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून वन विभागाचे अधिकारी, संयुक्त वन समिती, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष तोडीचे तोटे याची माहिती दिली जात आहे.
-अशिष ठाकरे, उप वनसंरक्षक, अलिबाग