
मातृभाषेतील शिक्षण सर्वोत्तम
अमित गवळे, पाली
इंग्रजी भाषेला दिवसागणिक महत्त्व वाढत असल्याने बहुसंख्य पालक, आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत. मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले तरच त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे विज्ञान सांगते. त्यामुळेच माणगाव येथील डॉ. उमेश दोशी यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात व जगाव्यात यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शिवाय मराठी भाषा संवर्धनासाठी ते अनेक उपक्रम राबवीत आहेत.
डॉ. दोशी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने मुलांमध्ये होणारा सर्वांगीण विकास कशा प्रकारे होते, या संदर्भात सहा ते सात वर्षांपासून मार्गदर्शन करतात. वृत्तपत्रातील लिखाण, इंग्रजी शाळांबाहेर मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे फलक लावणे, सोशल मीडियावर व्हिडीओ व व्याख्याने सादर करून मराठी शाळा टिकविण्यासाठी दोषी प्रबोधन व जनजागृती करतात. त्यामुळे अनेकांनी आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केल्याचे समोर आले आहे.
शास्त्रशुद्ध मांडणी
इंग्रजीत संभाषण करणे व शालेय अभ्यास इंग्रजीतून करणे या दोन वेगवगळ्या गोष्टी आहेत. इंग्रजीतून संभाषण करणे हा सरावाचा भाग आहे. तर शालेय अभ्यास इंग्रजीतून करणे बुद्धीचा भाग आहे. हुशारी किंवा बुद्धी माणसाला कशी मिळते हे ते उदाहरणास पटवून देतात. मोबाईल किंवा संगणक खरेदी करताना त्याची मेमरी किती आहे,ते पाहिले जाते. जितकी जास्त मेमरी, तितका जास्त डाटा त्यात राहतो. हाच नियम माणसालाही लागू आहे. आपली स्मरणशक्ती ही आपल्या न्युरॉन पेशींवर अवलंबून आहे. ज्या माणसाच्या मेंदूमध्ये जितक्या जास्त न्युरॉन पेशी तितकी त्याची जास्त स्मरणशक्ती. आपल्या सगळ्यांची बुद्धिमत्ता जन्मतः निश्चित झालेली असते. कुठलेही औषध करून ती वाढविता येत नाही हेच कटू सत्य आहे. इंग्लिश बोलणे हा सरावाचा भाग आहे व इंग्रजीमधून परिक्षा देणे व अभ्यास करणे हा बुद्धीचा भाग आहे.
मातृभाषेतील प्रश्नातून बौद्धांक विकास
जगातील सर्व शिक्षण तज्ज्ञांमध्ये व मानसशास्त्रामध्ये याचे अजिबात दुमत नाही की शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे. (जी महाराष्ट्रासाठी मराठी आहे). मूल २-३ वर्षाचे झाले की मातृभाषेतच प्रश्न विचारू लागते. ते जितके जास्त प्रश्न विचारतील, तितका जास्त बौद्धांक विकास होतो. याच वयात त्यांची जिज्ञासा व कुतूहल वाढते. नेमके याच वयात त्याला इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला पाठविले जाते. साहजिकच त्याचा इंग्रजी भाषेचा शब्दसमूह कमी असल्यामुळे त्याचे शिक्षकांना व पालकांना प्रश्न विचारणे कमी होते. परिणामी त्याच्या बुद्धीला चालना मिळत नाही. पुढील ४-५ वर्षात म्हणजे वयाच्या ८-९ वर्षापर्यंत त्याचा इंग्लिश भाषेचा शब्दसमूह वाढलेला असतो व ते प्रश्न विचारायच्या स्थितीत येते पण नेमके या वयात त्याची जिज्ञासा व कुतूहल कमी व्हायला लागते. आणि त्याची शिक्षकांना व पालकांना प्रश्न विचारण्याची इच्छा कमी होते. या मुळे त्यांचा प्राथमिक म्हणजेच मूळ पाया कमकुवत राहतो. जर पाया मजबूत असेल तरच इमारत चांगली उभी राहते, हा सर्वसाधारण अनुभव आहे.
मराठी माध्यमातून शिकणे हेच चांगले असल्याची जाणीव बऱ्याच सुज्ञ पालकांना आहे. पण लोक काय म्हणतील, पुढे इंग्रजी बोलताना त्रास होईल, यामुळे ते मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात. जर तुम्हाला तुमची मातृभाषा चांगली येत असेल तर तुम्ही जगातली कुठलीही भाषा कुठल्याही वयात शिकू शकता. चांगले इंग्लिश येणे ही सध्या काळाची गरज आहे, पण शिक्षणाचे माध्यम मात्र मातृभाषेतून असावे.
- डॉ. उमेश दोशी, माणगाव
पाली ः मराठी शाळा टिकविण्याचा ध्यास डॉ. उमेश दोशी यांनी घेतला आहे.