
मोबाईल लोकेशनच्या आधारे मारेकऱ्याचा शोध मोबाईल लोकेशनच्या आधारे मारेकऱ्याचा शोध
पाठलाग
प्रमोद जाधव, अलिबाग
पोलिस पाटीलला मारहाण करून पलायन करणाऱ्या मारेकऱ्याला रेवदंडा पोलिसांनी ३६ तासांत जेरबंद केले. मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत त्याला खार येथील बस स्थानकाजवळ अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
मुरूड तालुक्यातील वैभव बाळकृष्ण सुतार व त्याचा भाऊ जयवंत गंगाराम सुतार या दोन भावांमध्ये अनेक महिन्यांपासून शेतीबाबत वाद सुरू होता. ३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास या दोन भावांमध्ये शेत जमिनीच्या वाटणीवरून शाब्दिक वाद सुरू होता. त्यामध्ये दोघांमध्ये हाणामारी होऊ लागली. हा वाद मिटावा, यासाठी वैभवने गावातील पोलिस पाटील अशोक तांबडे यांना बोलावले. पोलिस पाटील यांनी मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जयवंतने आमच्या भांडणात पडू नको, असे त्यांना सांगितले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी जयवंतला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात जयंवतने पोलिस पाटीलांवर फावड्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यावर त्या पोलिस पाटीलांना वाचवण्यास गेल्या. मात्र, त्यांच्यादेखील हाताला गंभीर दुखापत झाली. पोलिस पाटील गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे जयवंतने तेथून पळ काढला. पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे, पोलिस हवालदार सुशांत भोईर, पोलिस नाईक सचिन वाघमारे, राकेश मेहत्तर यांनी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली.
जयवंतने पोलिस पाटीलांना मारहाण केल्यानंतर मिठेखार येथून बोटीने गोफणखाडीतून रोहा गाठले. तेथून रोहा एसटी बसने पनवेलला एका मित्राकडे गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत जयवंतचा शोध सुरू केला. सायबर गुन्हे शाखेची मदत घेत पसार झालेल्या जयवंतच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली. रात्रीचा दिवस करून पोलिस जयवंतच्या शोधात होते.
------------------------
पोलिसांचा खारपर्यंत पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जयवंतच्या मित्राचे घर गाठले; मात्र त्याठिकाणी जयवंत नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी जयवंतच्या मित्राला विश्वासात घेतले. तो कुठे जाणार असल्याची माहिती मिळवली. तो पनवेल येथून रेल्वेने मुंबईतील खारला जाणार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. लोकेशनच्या आधारे पाठलाग सुरू केला. ५ डिसेंबरला संध्याकाळी खार रेल्वेस्थानकात जयवंत उतरला. त्यानंतर तेथून बस पकडून खारकडे जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला होता. खार बस स्थानकाजवळ आल्यावर जयवंतला पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाण केल्याप्रकरणी जयवंत सुतार याच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.