
होलिकोत्सवावर करडी नजर
अलिबाग, ता. ५ (बातमीदार)ः अबाल-वृद्धांपासून सर्वांच्या आवडीचा असणाऱ्या होळीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण कालखंडानंतर पहिल्यांदाच होळी जल्लोषात साजरी करण्याची संधी मिळाल्याने रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे सणाच्या उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये, म्हणून पोलिस दलही सतर्क झाले असून जिल्ह्यात एक हजार २९४ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला आहे.
कोकणात होळीला विशेष महत्त्व आहे. तळ कोकणापासून दक्षिण रायगड, उत्तर रायगडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. रायगड जिल्ह्यात होळी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे आदी ठिकाणी व्यवसाय, तसेच नोकरीनिमित्त असलेला चाकरमानी कुटुंबासह गावाकडे निघाला आहे. त्यामुळे गावागावांमध्ये उत्साह आहे. जिल्ह्यात तीन हजार ९५२ ठिकाणी होळ्या उभारल्या जाणार असून शहरी भागासह ग्रामीण भागात होलिकोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी महत्त्वाच्या अशा सणासाठी रायगड पोलिस सज्ज झाले आहेत.
---------------------------------------------
एक हजार २९४ कर्मचारी तैनात
होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे येत असल्याने रस्ते वाहतुकीवर त्याचा ताण पडतो. अशातच सध्या मुंबई-गोवा महामार्गावर विविध कामे सुरू असल्याने कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवला जाणार आहे. त्यामध्ये १३८ पोलिस अधिकारी, ७९५ पोलिस कर्मचारी, १८१ होमगार्ड, सहा स्ट्रायकिंग फोर्स, दोन राखीव पोलिस दल, एक अति शीघ्र कृती दलाचा देखील समावेश आहे.
--------------------
भुरट्या चोरट्यांवर विशेष लक्ष
जिल्ह्यातील २८ पोलिस ठाणी स्तरावर देखील पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दोन दिवस सण साजरा करताना, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गावपातळीसह शहरी भागात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. होळी व धूलिवंदन सण साजरा करताना महिलांची छेडछाड करणाऱ्यांसह अतिउत्साही व भुरट्या चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर दामिनी व बीट मार्शल पथक तैनात असणार आहे.
.............
होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला जाणार आहे. होळीच्या दरम्यान काही मंडळी मद्यपान करून वाहन चालवतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे. तसेच मुंबई, पुणे, बोरिवली येथून गावी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे.
- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड
---------------------