
अलिबाग-मुरूड एसटी सेवा सुरू करा
अलिबाग, ता. ९ (बातमीदार) : अलिबागकडून मुरूडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु, अलिबाग एसटी बस आगारातून मोजक्याच एसटी बस सोडल्या जातात. पुणे, स्वारगेट, मुंबई येथून येणाऱ्या एसटीच्या भरोवशावर प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना बसत आहे. मुरूडकडे जाणाऱ्या बस उपलब्ध नसल्याने तासनतास प्रवाशांना स्थानकात बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी अलिबाग-मुरूड एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
अलिबाग व मुरूड हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणी ओळखली जातात. ऐतिहासिक, धार्मिक स्थळांच्या बाबतीतही अलिबाग व मुरूड ही दोन तालुके नावारूपाला आली आहेत. त्यात नोकरी, व्यवसायानिमित्त अलिबाग व मुरूडकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत; परंतु अलिबाग एसटी आगारातून मुरूडसाठी दिवसातून एक ते दोन बस सोडल्या जातात. त्याचा नाहक त्रास या मार्गावरील प्रवाशांसह विद्यार्थी व पर्यटकांना होत आहे. मुरूडकडे जाणाऱ्या बस अलिबाग एसटी बस आगारातून येत नसल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. मुंबई, पुणे, स्वारगेट, ठाणे येथून मुरूडकडे जाणाऱ्या बसच्या भरोवशावर प्रवाशांना राहावे लागत आहे. या बस वेळेवर येत नसल्याने तासनतास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. मुरूडकडे जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करून अलिबाग आगारातून एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.