
महिला रमल्या पारंपरिक खेळात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : लहानपणी खेळलेल्या कांदा फोडी, फुगडी, दोर उडी अशा पारंपरिक खेळांबद्दल अनेक महिलांना अद्यापही आकर्षण आहे; परंतु नोकरी, कामधंद्यामध्ये व्यस्त असलेल्या या महिला यापासून दुरावल्या आहेत. हा दुरावा कमी करण्यासाठी वरसोली समुद्रकिनारी पारंपरिक खेळांमध्ये अलिबागमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला.
जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड, नेहरू युवा केंद्र अलिबाग, प्रीझम सामाजिक संस्था अलिबाग, श्रीबाग लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पारंपरिक खेळाचे आयोजन वरसोली समुद्र किनाऱ्यावर महिल दिनानिमित्त नुकतेच केले होते. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून रायगड जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, ॲड. नेहा राऊत, ॲड. कलाताई, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तपस्वी गोंधळी, नेहरू युवा केंद्र अलिबागचे समन्वयक निशांत रौतेला, प्राची जोशी, प्राजक्ता कोकणे, सुचिता साळवी, मनीषा मानकर, सचिन निकम, संदीप वांजळे, वरसोली ग्रामपंचायतचे सदस्य महिला, महिला, विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी महिलांनी चकरी टायर चालवणे, लगोरी, कांदा फोडी, फुगडी, मामाचे पत्र, दोर उडी या खेळांचा आनंद लुटला. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी मानले