अखेर जंजिरा किल्ल्यात अद्यावत जेटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर जंजिरा किल्ल्यात अद्यावत जेटी
अखेर जंजिरा किल्ल्यात अद्यावत जेटी

अखेर जंजिरा किल्ल्यात अद्यावत जेटी

sakal_logo
By

मुरूड, ता. १४ (बातमीदार) : राज्यभरातील पर्यटकांची मोठ्या संख्येने वर्दळ असलेल्या जंजिरा किल्ल्यावर तरंगत्या जेटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम अडीच वर्षांत पूर्ण होणार असून, पर्यटकांना दमछाक न करता जंजिरा पाहता येणार आहे. ९३.५७ कोटी रुपये खर्चून जंजिरा किल्ल्यात जेटी उभारण्यात येत आहे. जेटीचा ढाचा राजपुरी येथे तयार करून तो बोटीतून किल्ल्यापर्यंत नेऊन तेथे तो जोडण्यात येणार आहे.
जंजिरा किल्ल्यात प्रवेशद्वाराजवळ विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होडीतून उतरताना मोठी कसरत करावी लागत असे. सुलभरीत्या शिडाच्या होड्यांमधून किल्ले दर्शनासाठी जाताना तरंगत्या जेटीची मागणी होत आहे. भरती-ओहोटीदरम्यान लाटांच्या माऱ्यामुळे होडी कलंडण्याची शक्‍यता असते. यासाठी होडीवरील कामगारांना प्रवाशांची काळजी म्हणून खूपच सतर्क राहावे लागते. त्यात जंजिऱ्यात दाखल होत असलेल्या हौशी पर्यटकांमध्ये लहान बालके व महिलांचा अधिक भरणा असतो. त्यामुळे जंजिरा किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तुला बाधा न पोहचवता जेटी बांधावी, अशी मागणी पर्यटकप्रेमी सातत्याने करत होते. रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या जेटीसाठी आवश्यक मंजुऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. किल्ल्याच्या मागील बाजूस ही जेटी बांधण्यात येत आहे. भरतीच्या वेळेलाही या जेटीला होड्या थांबू शकणार आहेत. बांधकाम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर पर्यटकांना अगदी सुलभपणे जंजिरा किल्ला पाहता येणार आहे. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी राजपुरी येथील जेटीचे काम पूर्ण झालेले आहे. तर किल्ल्यातील तरंगत्या जेटीचे काम शिल्लक आहे.

---
बांधकामासाठी आवश्यक खडी, कास्टिंगसाठी सांगाडे तयार करणे यासारखे सेटअपची कामे सध्या सुरू आहेत. हे काम एकूण कामाच्या सहा ते सात टक्के आहे. दोन हजार मेट्रिक टन खडी जमवण्यात आलेली असून, काही दिवसांतच प्रत्यक्ष जेटीच्या कामाला सुरुवात होईल. जेटीचे सुटे भाग तयार करून तराफ्याच्या साह्याने ते जेटीपर्यंत नेण्यात येतील.
- तुषार पाटोळे, कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड