सुधागड तालुक्यात राष्ट्रवादीला उर्जितावस्था

सुधागड तालुक्यात राष्ट्रवादीला उर्जितावस्था

पाली, ता. १५ (वार्ताहर)ः काही महिन्यांपूर्वी पाली नगरपंचायत माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र नुकतेच सुधागड तालुक्यातील नाडसुर ग्रामपंचायतीतील धोंडसे, वैतागवाडी, नाडसूर व ठाणाळे आदिवासीवाडी व अन्य गावातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था प्राप्त झालेली दिसते. सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व आमदार अदिती तटकरे यांनी केले.
सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटना मजबूत व्हावी, यासाठी तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे व त्यांचे सहकारी प्रयत्‍नशील आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून राष्ट्रवादीचा गड भक्कम करण्यावर भर दिला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण ज्या विश्वासाने प्रवेश केला तो विश्वास कायम सार्थकी ठरवू, सुधागड तालुक्यातील गाव खेड्यापाड्याचा शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्‍याचे विकासकामांना निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली.
आमदार अदिती तटकरे म्हणाल्या, गीता पालरेचा यांनी भाजपची वाट धरली. सुनील तटकरे यांनी, ज्यांना ज्यांना नेतृत्वाची संधी दिली, त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. सत्ता असो अथवा नसो, विकासकामे करण्याची धमक खासदार सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, असा दृढ व परिपूर्ण विश्वास जनतेला असल्‍याचे अदिती यांनी स्‍पष्‍ट केले.
संदेश शेवाळे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत. तटकरे कुटुंबीयांनी जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेला मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाले आहे. पाच गावांतील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्‍याचे शेवाळे यांनी स्‍पष्‍ट केले.

गीता पालरेचा यांना बॅनरवरही स्थान नाही
गीता पालरेचा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा मान सन्मान होता. आज भाजपमध्ये गीता पालरेचा यांचा बॅनरवर फोटो येत नाही, अशी अवहेलना होते तेव्हा दुःख वाटत असल्‍याचे अनिकेत तटकरे यांनी सांगितले. सुधागड तालुक्यात त्यांना पक्ष संघटनेने भरभरून देण्याचा प्रयत्न केला. पालरेचा यांचे वडील वसंतराव ओसवाल हे अनेक वर्षे सुनील तटकरे यांच्यासोबत होते व आजही आहेत. मात्र महाविकास आघाडीची सत्ता राज्यात बदलली आणि गीता पालरेचा व काही सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना वाटले, राष्ट्रवादी पक्ष सोडला तर पक्ष नेस्तनाबूत होईल. शून्य होईल मात्र पक्षाची विचारधारा व पक्षसंघटना मजबूत असल्‍याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले आहे.

विकास निधीचे पत्र सुपूर्द
सुधागड तालुक्यातील धोंडसे अंतर्गत रस्ता, वैतागवाडी अंतर्गत रस्ता, ठाणाळे आदिवासी वाडी अंतर्गत रस्ता, नाडसूर आदिवासीवाडी अंतर्गत रस्ता असे एकूण २६ लाखांचा निधी आमदार फंडातून दिल्‍याचे पत्र यावेळी देण्यात आले.

पाली ः राष्‍ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्याचे आमदार अनिकेत तटकरे, अदिती तटकरे यांनी स्‍वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com