कर्मचारी संपाची धार तीव्र होणार

कर्मचारी संपाची धार तीव्र होणार

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने संपाची धार अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न कर्मचारी संघटनांचा आहे.
संपाचा पुढील टप्पा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसीलदार कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता थाळी नाद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (ता. २३) ब्लॅक डे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या दिवशी सर्व कर्मचारी-शिक्षक काळे झेंडे घेऊन सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करणार आहेत. यानंतरही तोडगा न निघाल्यास शुक्रवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयावर महा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नियोजनाकरिता जिल्ह्यातील कर्मचारी व शिक्षक संघटनांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर होते. याशिवाय बैठकीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, तलाठी संघटनेचे अध्यक्ष वल्लभ मसके आदी विविध संघटना पदाधिकारी उपस्‍थित होते.

..................

संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः जुनी पेन्शन लागू करा अशा अनेक मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी पाच दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचारी संपावर गेल्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे. संपकऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
जिल्ह्यात अलिबागसह अनेक तालुक्यांतील महसूल, वन, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी सर्व विभागातील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विविध प्राधिकरण, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व कर्मचारी, सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व चतुर्थ श्रेणी( गट ड) कर्मचारी, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगार, सर्व शासकीय कार्यालयातील अंशकालीन, रोजंदारी व कंत्राटी कर्मचारी, महिला परिचर अशा ६२ विभागातील १५ हजारपेक्षा अधिक कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. संपामुळे सरकारी कार्यालयातील कामाचा वेग मंदावला आहे.
प्रशासनाने संपावरील कर्मचाऱ्यांवर कारवाईची बडगा उगारला आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीचा भंग, शिस्तभंगाची कारवाई करण्यात का येऊ नये, याचा खुलासा कार्यालयात उपस्थित राहून करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र प्रत्येक संपकरी कर्मचाऱ्यांना देऊन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

परिचारिका पुन्हा रुजू
जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला. संपात अलिबाग जिल्हा रुग्णालयातील परिचारिका देखील सहभागी झाल्या होत्या. परंतु कंत्राटी परिचारीकांवर कामाचा भार पडू लागला. त्यात रुग्णांच्या सेवेवरही परिणाम झाला. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी संपावर गेलेल्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. मात्र काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा कायमच दिला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांकडून देण्यात आली आहे.

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत वारंवार आवाहन केले आहे. त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबत त्यांना पत्र देण्यात आले आहे.
- डॉ. योगेश म्हसे,
जिल्हाधिकारी, रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com