अलिबाग-रोहा रस्त्याचा श्रेयवाद संपेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग-रोहा रस्त्याचा श्रेयवाद संपेना!
अलिबाग-रोहा रस्त्याचा श्रेयवाद संपेना!

अलिबाग-रोहा रस्त्याचा श्रेयवाद संपेना!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : मागील पाच वर्षांत अनेकदा भूमिपूजनाचे नारळ फोडूनही अलिबाग-रोहा या रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाही. आता पुन्हा या रस्त्याचा विषय गाजू लागला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपने नारळ फोडत या कामाला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याचे श्रेय आमचेच असल्याचे म्हणत दुसऱ्यांदा भूमिपूजन केले. परंतु तीनच दिवसांत या रस्त्याचे काम कंत्राटदाराने थांबवले. हा विषय विधानसभेत आमदार जयंत पाटील यांनी मांडत या रस्त्याचे काम शेकापच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याचा दावा केला आहे. सध्या रस्तेकामाला पुन्हा सुरुवात झाली असली, तरी कामाचा वेग मात्र हा संथ गतीने आहे.
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचा प्रश्‍न विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला. या दरम्यान नव्याने निविदा प्रक्रिया राबवून नवा कंत्राटदार नेमावा, अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. अखेरीस या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी हमी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. मात्र, हे उत्तर देतानाच चव्हाण यांनी जयंत पाटलांना प्रतिप्रश्न विचारून तुम्हाला हा रस्ता नको आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे या ८५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामामधील श्रेयवादाचा स्पीडब्रेकर अद्याप कायम असून यावरून रायगडमधील राजकारण तापू लागले आहे. या रस्त्याला ३० नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार २१५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले, करारनाम्यातील तरतुदींनुसार १३.१४ कोटी रुपये इतकी आरंभीची रक्कम कंत्राटदाराला दिलेली आहे. सुडकोली गावाजवळ त्याने बॅच मिक्स प्लान्ट आणि रेडीमिक्स प्लान्ट उभारले आहेत. त्यानंतरही या रस्त्याचे काम अधिकृतरित्या सुरू झाले नाही, हे मंत्र्यांनी मान्य केले. गुढीपाडव्यानंतर सुरू झालेले कामही बंद पडले होते. आता या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे; मात्र त्याचा वेग काहिसा मंद आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणारे संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
---
२०१७ मध्ये आमच्या प्रयत्नामुळे अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. तत्कालिन सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गासाठी विशेष तरतूद केली होती. मात्र, त्यानंतर स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी विविध कारणांमुळे अडथळे आणल्याने ते काम पुढे सरकू शकले नाही. अखेर गेल्या वर्षी या कामाच्या निविदा नव्याने काढण्यात येऊन नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली; मात्र तरीही हे काम रेंगाळत राहिले. या पार्श्‍वभूमीवर या कामातील दिरंगाई व ठेकेदाराचा वेळकाढू कारभार लक्षात घेता या रस्त्याची फेरनिविदा काढावी.
- आमदार जयंत पाटील
---
तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात हायब्रीड अन्युटी योजना सुरू केली होती. त्यामुळे या कामात भाजपचेही श्रेय आहे. यात ६० टक्के सरकार व ४० टक्के कंत्राटदाराचा सहभाग या तत्त्वावर रस्त्याचे काम करायचे होते. यासाठी महाराष्ट्रातील कंत्राटदार न मिळवल्याने २५ नोव्हेंबर २०२१ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथील जे.आर.ए. अलिबाग रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी या कामात अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे हे काम थांबले होते.
- सतिष धारप, भाजपा दक्षिण रायगड संघटक
---
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडे खास बैठकाही घेतल्या. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या रस्त्याला प्राधान्य दिले. भाजपच्या नेत्यांनीही आमचे प्रयत्न मान्य केले; परंतु शेकापला भीती वाटू लागल्याने त्यांचे नेते या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील जनतेच्या भल्यासाठी हा रस्ता व्हावा, असे माझे प्रामाणिक प्रयत्न असून निर्धारीत वेळेत ते पूर्ण झालेले असेल.
- आमदार महेंद्र दळवी