वीट व्यावसायिक उपेक्षीत

वीट व्यावसायिक उपेक्षीत

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) ः वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणाई वीट व्यवसायाकडे वळू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वीट भट्टी व्यवसाय वृद्धिंगत होत आहे, मात्र महिनाभरापासून या व्यावसायिकांवर अस्मानी संकट ओढवले आहे. तयार विटा अवकाळी पावसामुळे भिजल्‍याने त्‍यांचा अक्षरशः लगदा झाला आहे. वीट भट्टी व्यावसायिकांचे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये भात शेतीनंतर थंडीच्या हंगामात वीट भट्टी व्यवसायाला सुरुवात होते. नोकरी व्यवसाय नसल्याने अनेक तरुणांनी हा व्यवसाय सुरू केला तर काहींनी त्‍यासाठी कर्ज काढले. जिल्ह्यात औद्योगिकीकरण, फार्महाऊस, मोठमोठे गृहप्रकल्‍प घरे राहत असल्‍याने विटांची मागणी वाढली आहे.
मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे जवळपास दीड कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. किमान रॉयल्‍टी भरणाऱ्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्‍याची खंत व्यावसायिकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

अडीच हजार वीट व्यावसायिक
अलिबागसह पेण, कर्जत, पनवेल, रोहा आदी जिल्‍हाभरात सुमारे अडीच हजार वीट व्यावसायिक आहेत. या व्यवसायातून जवळपास दोन लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. वीट तयार करणारे कारागीर, मजूरकर, विटांची वाहतूक करणारे वाहनचालक, वीट भरणारे, वीट उतरवणारे अशा अनेक कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो.
....................

वीटभट्टी विमा उतरवावा
शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

पाली, ता. ११ (वार्ताहर) ः अवकाळी पावसाने जिल्ह्यातील वीट भट्टी व्यावसायिक अक्षरशः उद्‌ध्वस्त झाले असून त्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्‍यांना सरकारने अर्थसाह्य द्यावे व वीटभट्टी विमा उतरवावा, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी केली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळासह लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
अनेक तरुण उदरनिर्वाह व रोजगाराचे साधन म्हणून वीटभट्टी व्यवसायाकडे वळत आहेत. उसनवार, व्याजाने पैसे उचलून अथवा आपल्या जवळची पै-पै जमा केलेली रक्कम खर्ची घालून तो वसायात पाय रोवण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र ऐन हंगामात अवकाळी पावसाने वीटभट्ट्या उद्‌ध्वस्‍त झाल्‍या आहेत.
पावसामुळे सुधागड, माणगाव, रोहा, महाड , पोलादपूर , खालापूर, कर्जत, अलिबाग, पेण, मुरूडसह जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळा अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यामध्ये आंबा, काजू तसेच ऐन रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने सरकारकडून पंचनामे केले जात आहेत. मात्र वीटभट्टी व्यावसायिक पूर्णपणे दुर्लक्षित आहे.
विटा भाजण्यासाठी लागणारा भाताचा कोंडा, कोळसा किंवा तूस पावसामुळे भिजल्याने भट्टी लावण्यात अडचणी येत आहेत. दोन तीन वर्षांपासून कोरोना, लॉकडाऊन, अवकाळी पावसामुळे वीटभट्‌टी व्यवसाय तोट्यात आहे. त्‍यामुळे रायगडातील वीटभट्टी चालक-मालक यांना अर्थसहाय्य करावे व वीटभट्टी व्यवसायाचा विमा उतरवावा, अशी मागणी प्रकाश देसाई यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com