
उंबरवाडीच्या विकासाला गती
पाली, ता. १८ (वार्ताहर) : शिवसेनेचे पदाधिकारी संदीप दपके व नगरसेविका कल्याणी दपके यांनी स्व:खर्चाने उंबरवाडी येथील मरीमाता मंदिराचे सुशोभीकरण; सुसज्ज बस थांबा आणि स्मशानभूमी अशी विविध विकासकामे केली. या सर्व विकासकामाचे रविवारी (ता. १६) शिवसेना रायगड जिल्हासंपर्क प्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख, पाली नगरपंचायत नगराध्यक्षा प्रणाली शेळके, शिवसेना रायगड जिल्हा युवा प्रमुख संजय म्हात्रे व उपस्थित नगरसेवक, नसगरसेविका, ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पाली-खोपोली मार्गावर उंबरवाडी येथे चांगल्या दर्जाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांत न झालेली विकासकामे नगरसेविका दपके यांनी केली आहेत. अजूनही विविध विकासकामे सुरू असल्याने प्रभाग क्रमांक २ चे रूपडे पालटत आहेत. आज त्यांनी विविध विकासकामे स्व:खर्चाने केली आहे, असे मत या वेळी उंबरवाडी, बेघर आळी, ऐकलघर ग्रामस्थ व महिलांनी व्यक्त केले. यावेळी प्रकाश देसाई म्हणाले, संदीप दपके व कल्याणी दपके यांनी स्व:खर्चाने विकासकामे केली आहेत. तसेच १ कोटी ८० लाखांची कामे शिवसेनेच्या माध्यमातून आणली आहेत. त्यामुळे किमान विधायक कामांमध्ये सर्व नागरिकांनी राजकारण बाजूला ठेऊन आपल्या प्रभागाचा विकास होत आहे.