
अलिबागमधील १४० गावठाणांचे ड्रोन सर्व्हे
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन हा महत्त्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वीरीत्या सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांकडून अलिबाग तालुक्यातील १४० गावाचे स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे झाला आहे. साधारण ८० गावांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण १३ गावाचे सनद (मालकी हक्काचा पुरावा) तयार करण्यात आले असून ते सर्व घराचे मालक, धारक यांना वाटपाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. अलिबाग तालुक्यातील संपूर्ण १४० गावांची सनद तयार करून पूर्ण शंभर टक्के लोकांना त्यांच्या घरापर्यंत सनद मे २३ अखेर पोहचविण्याचे उद्दिष्ट उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश, कोकण (मुंबई) जयंत निकम यांनी अलिबाग तालुक्याला दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनानुसार, प्रत्येक गावात सनद वाटप कार्यक्रम सुरू केला आहे. यासाठी अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार बाळासाहेब दुरगडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे संबंधित गावांचे ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने सनद वसुली झाली आहे. याकामी सर्व मोहिमेचे नियोजन व जनतेच्या शंका समाधान कामी उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग प्रदीप जगताप स्वतः हजर राहून कामकाज पाहत आहेत.