जिल्ह्याच्या वेगवान विकासासाठी कटिबद्ध

जिल्ह्याच्या वेगवान विकासासाठी कटिबद्ध

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि दुसरीकडे औद्योगिक विकास असे संतुलन साधत, रायगड जिल्हा विकासाकडे मार्गक्रमण करीत आहे. ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ या ध्येयानुसार रायगड जिल्ह्यात विकासाची घोडदौड अधिक वेगाने होण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम व योजनांमधून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिले. अलिबाग येथील पोलिस परेड मैदानात महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री रायगड उदय सामंत उपस्‍थित होते.
यावेळी पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, रायगड जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. यात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात विकासाला गती देण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला ३२० कोटी रुपये इतका निधी शंभर टक्के खर्च करण्यात आला. यामुळे निधी खर्चात आपला रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे.
जिल्ह्यात कृषी, मत्स्य व्यवसाय, उद्योग तसेच पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. गड-किल्ले, अभयारण्ये, समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवरील पायाभूत सोयी-सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्‍याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
वातावरणीय बदल, चक्रीवादळ, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भूस्‍खलन अशा विविध घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे काम उत्तम होण्यासाठी महसूल व पोलिस विभागासह संबंधित सर्व विभागांना आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन सामंत यांनी दिले. कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

१४ तालुक्यात ‘आपला दवाखाना’
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्‌घाटन तथा लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत लवकरात लवकर उभी राहील, याकरिता आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी या ‘आपला दवाखाना’ मध्ये विनामूल्य सेवेचा लाभ घेता येणार आहे.


भूमी अभिलेखचे नूतनीकरण
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख नूतनीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालयाकडील १६ लाख ५६ हजार २५७ पानांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. मूळ भूमापन नकाशांचे एकूण १३ प्रकारातील नकाशा अभिलेखांच्या २ लाख १४ हजार ७९१ शिटचे २२ लाख ५ हजार १५५ पॉलिगॉनचे काम पूर्ण झाले आहे.


विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष
शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी राष्ट्रीय आरोग्य योजना, समग्र शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना लागू करण्यात आल्‍या आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ३ हजार ८९ शाळांमधील पहिली ते पाचवीचे एक लाख १० हजार ५१ विद्यार्थी व इयत्ता सहावी ते आठवीचे ७१ हजार १५५ लाभार्थी लाभ घेत आहेत.

पाळीव जनावरांचे लसीकरण

जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार इतक्या गुराढोरांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले. ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम प्रत्येक गोठ्यात यशस्वीपणे राबविण्यात आली. यामुळे लम्पीसारख्या आजारावर यशस्वीपणे मात करता आल्याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे अभिनंदन करून उदय सामंत यांनी कौतुक केले.

रोजगार निर्मिती कार्यक्रम
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यमक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राने बँकेकडे शिफारस केलेली एकूण प्रकरणे ९९४ होती. त्यापैकी १७५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ८३७ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. तर ७१० उमेदवारांचे मूल्यांकन झाले आहे.
- पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत ऑफलाईन चार व ऑनलाईन १२ असे एकूण १६ मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात एकूण ६१ उद्योजक सहभागी झाले होते. यासाठी १ हजार ५७ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ३३ उमेदवारांची अंतिम निवड तर २७५ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

पोलिस, लघुउद्योजकांचा सत्कार
उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक बहाल करण्यात आले. तर महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावणारे परिविक्षाधीन उपनिरीक्षक विशाल शिर्के, सहायक फौजदार दीपक मोरे, सचिन वाणी, दत्ता श्रीवर्धनकर, अंकुश जाधव, महिला हवालदार जागृती पाटील, हवालदार परेश म्हात्रे, अरुण घरत, प्रतीक सावंत यांना सन्मानित करण्यात आले. तर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यामध्ये मे. विक्रम एंटरप्रायझेसच्या पल्लवी जोशी, मे.पी.के. फॉईल्सचे अनिल खालापूरकर यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com