आरोग्‍यवर्धक मोहाची फळे

आरोग्‍यवर्धक मोहाची फळे

अमित गवळे, पाली
रायगड जिल्ह्यात नैसर्गिक ठेवा मुबलक प्रमाणात असून वेगवेगळ्या हंगामात येणाऱ्या अनेक रानभाज्‍या खवय्यांकडून आवडीने खाल्‍ल्‍या जातात. सध्या मोहाची फळे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. मोहाच्या फळापासून रुचकर व स्वादिष्ट भाजी बनवली जाते. आरोग्‍यवर्धक असल्‍याने ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. आदिवासी बांधव जंगलातून ही फळे विक्रीसाठी आणत असल्‍याने त्‍यांनाही रोजगाराचे साधन मिळाले आहे.
काही ठिकाणी किलोवर तर काही ठिकाणी २० ते ३० रुपये वाट्याने मोहाची फळे मिळतात. मोहाच्या झाडाला आदिवासी लोक कल्पवृक्ष मानतात. मूळ स्थान भारतीय असलेल्‍या मोहाला वसंत ऋतूत फुले लागतात. हे झाड पर्णझडी मिश्र जंगलामध्ये नद्या-नाल्यांच्या काठी, शेताचे बांध आदी ठिकाणी आढळतो. राज्यात ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, रायगड, विदर्भ इत्यादी ठिकाणी मोहाची झाडे मोठ्‌या संख्येने आढळतात. रायगड जिल्ह्यात आदिवासी लोक उन्हाळ्यात मोहाची फळे व त्यांच्या बिया गोळा करून विक्री करतात. नव्या हंगामातील उपयुक्त भाजी म्हणून मोहाच्या फळाची भाजी आवर्जून खाल्‍ली जाते. मोहाच्या बियांमध्ये सुमारे ४५ ते ५० टक्के खाद्य तेल आणि १६ टक्के प्रथिने आहेत. तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबण निर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो.

रुचकर, स्वादिष्ट भाजी
गडद हिरव्या कच्च्या मोहाच्या फळाची भाजी बनवली जाते. फळाला स्वच्छ धुवून आतील बी काढून बारीक चिरून घ्यावे. त्यानंतर तेलात कांदा, लसून व मिरची वर परतून घ्यावे आणि वर झाकण ठेवावे. चव वाढविण्यासाठी काहीजण ओले खोबरे किंवा वाटण देखील घालतात. फळ चिरून ते आंबोशीसारखे उन्हात सुकवता येते.
अशा प्रकारे मोहाची रुचकर व स्वादिष्ट भाजीची चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळत असल्‍याचे वयोवद्ध महिलेकडून सांगण्यात आले.

शास्‍त्रोक्‍त माहिती
- शास्त्रीय नाव - मधुका इंडिका आणि मधुका लॉन्जिफोलिया
- मोहाचे झाड द्विदल प्रकारातील असून जलद गतीने वाढते. झाडाची उंची साधारण १५ ते २० मीटर असते. घेरही मोठा असतो.
- झाडाची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात. खोड मजबूत व टणक असते. पाने लंबगोलाकार, फांदीच्या शेंड्याला गुच्छाने फुले येतात.
- झाडाला ८ ते १२ वर्षांनंतर फळे यायला सुरवात होते. फुले येण्याचा कालावधी फेब्रुवारी ते एप्रिल महिना आणि फळे येण्याचा कालावधी एप्रिल ते जून महिना असा असतो.

फळांचा उपयोग
- भाजीसाठी फळांचा अधिक उपयोग होतो.
- पक्षी व वटवाघळांचे आवडीचे खाद्य.
- फळांचा उपयोग शिकेकाईबरोबर केस धुण्यासाठी
- फळे शुक्रवर्धक, बल्य आणि शीतल असतात
- फळांच्या बियांपासून सुगंधी तेल निर्मितीसाठी
- बियांपासून तयार केलेले मलम त्वचा उजळ होण्यासाठी उपयोगी


मोहाच्या झाडाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व -
- मोहाच्या बियांमधील (मोहिटी) तेलाचे प्रमाण ४५ ते ५० टक्के
- एका मोहाच्या झाडापासून वर्षाकाठी १०० ते १२० किलो बिया आणि ७० ते ८० किलो फुले मिळतात.
- फुले व बिया गोळा करण्याचा हंगाम एप्रिल ते जून
- सुकलेल्या फुलांमध्ये ७१ टक्के साखरेचे प्रमाण
- एक टन वाळलेल्या फुलांपासून १३० लिटर एब्सलूट (विशुद्ध) अल्कोहोल तयार करण्याची क्षमता
- मोहाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडीत १९.५ टक्के क्रूड प्रोटीन असते. या पेंडीचा उपयोग जनावरांच्या पशुखाद्यात किंवा बायपास प्रोटीन म्हणून करता येऊ शकतो.
- पेंडीचा उपयोग वेगवेगळ्या पिकांमध्ये खत व कीटकनाशक म्हणून करण्याबाबत संशोधन सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com