ग्रामीण भागात रहाटाचा आवाज दुर्मिळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात रहाटाचा आवाज दुर्मिळ
ग्रामीण भागात रहाटाचा आवाज दुर्मिळ

ग्रामीण भागात रहाटाचा आवाज दुर्मिळ

sakal_logo
By

महेंद्र दुसार
कोकणात नारळीपोफळीची लागवड फार पूर्वीपासूनची आहे. गावागावांमध्ये वीज पोहचली नव्हती, तेव्हा मोठमोठ्या वाड्यांना शिंपणे घालण्यासाठी त्या वेळी रहाटाचा वापर केला जायचा. रहाटाचा कर्र कर्रर्र... आवाज येऊ लागला की पहाट झाली, असा जणू शिरस्ताच होता. वाडीला शिंपणे घालण्यापासून भांडीकुंडी, कपडे धुण्यासाठी महिलांची लगबग, त्यातच लहान मुलांची लुडबूड आणि भल्या पहाटे पाटाच्या थंड पाण्यात मनसोक्त डुंबण्याची मजा काही वेगळीच होती. मात्र काळाच्या ओघात ग्रामीण भागातील रहाटाची जागा पंप, नळाने घेतली आहे.
पन्नास-साठ वर्षांपूर्वी रहाटाचे पाणी हा ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य भाग होता. आता इलेक्ट्रिकचे पंप विहिरींवर बसवण्यात आल्‍याने रहाटाचा आवाज बंद झाला आहे. तसेच गाडगे किंवा मडके, रहाटाचा बैल, द्रोणी हे सारे शब्द आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
कोकणात नारळीपोफळीच्या भल्या मोठ्या बागा आजही दिसून येतात, पूर्वी दिवसातून एकदा किंवा जरुरीप्रमाणे एक दिवसाआड वाडीला पाणी देण्याचा ‘शिंपणे काढण्याचे काम केले जायचे. साधारणपणे ५० पर्यंत मडक्यांची माळ गोलाकार चक्रावर लावून रहाट फिरविण्यासाठी टोणगा किंवा बैल जुंपला जायचा. दरदिवशी ताजे प्यायचे पाणी रहाट चालू असेल त्यावेळात भरून ठेवावे लागे.
सध्या नोकरीनिमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले गणेश आपटे आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगतात, रहाटाच्या आवाजानेच आम्हाला जाग येत असे. सकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान गड्याने रहाट सुरू केल्यावर लगबग सुरू व्हायची. मुरूड, नांदगाव, रेवदंडा, अलिबाग, आक्षी, नागाव, सासवणे, दिवेआगरमध्ये आकाराने मोठ्या वाड्यांमध्ये अशाप्रकारचे रहाट वापरात होते. या रहाटाच्या पाण्यावर वाडीतील अन्यपिके बहरायची. अगदी काळीमीरीपासून, नागवेळ, केळी, दुधी, तोंडली, टॉमेटो, मिरचीसह सर्व प्रकारची फुलझाडे लावलेली असत. सोनचाफा, मोगरांच्या सुंगधी फुलांसह लाल जास्वंद, पांढरी तगर, जाई, जुई अशा अनेक प्रकारच्या फुलाने उन्हाळ्यातही हा परिसर बहरलेला असे. रहाटाच्या बाजूलात रहाटाच्या बैलांसाठी बेडा असे. त्यातच गाई, म्हशींची बांधणी असे. आता हे सर्व इतिहास जमा झाले आहे. आता बहुतांशः घरांमध्ये नळाद्वारे पाणी येते. आलेले पाणी टाकीत भरल्‍या जात असल्‍याने पहाटे उठण्याचीही तितकीशी गरजच राहिलेली नाही.

विहिरीतील पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जाई. बैल जोडून रहाट चालू केला की विहिरीतील पाण्यांनी भरलेले मडके ठराविक ठिकाणी रिकामे व्हायचे. मडक्याने उपसलेले पाणी एका द्रोणीत पडायचे. पुढे दांड्याने वा पाटाने प्रत्येक झाडाला पाणी सोडण्याची व्यवस्था केली जायची. प्रत्येक झाडाभोवती मातीचे वाफे असत. पाणी काढणाऱ्या गड्याचे यावर पूर्ण लक्ष असायचे, मात्र आता गावातील रहाट गायब झाले आहेत.
- द्वारकानाथ नाईक, रहिवासी, नागाव