
रायगडमध्ये रुग्णांचे हाल
अलिबाग, ता. ९ : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन काही दिवसांपासून बंद आहे. जिल्हा रुग्णालयातील मशीन काही तांत्रिक कारणामुळे बंद झाल्यास अलिबागमधील लोटस् सिटी स्कॅन केंद्रासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे; परंतु ही मशीन बंद असल्याने रुग्णांना वडखळ किंवा नवी मुंबई येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल प्रचंड हाल होत आहेत.
उपचारापूर्वी रोग निदान होण्यासाठी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जिल्हा रुग्णालयात ही सुविधा कार्यान्वित नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णवाहिका करून जाणे अतिशय खर्चिक पडत आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज किमान दोनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. गर्भवती महिला, अपघातग्रस्त व अन्य रुग्णांना तातडीने सिटी स्कॅनमार्फत आजाराचे निदान व्हावे, यासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन रिलायन्स कंपनीने सामाजिक दायित्व फंडातून उपलब्ध करून दिली होती. दोन महिन्यांपूर्वीच या मशीनमध्ये मोठा बिघाड झाला होता. कंपनीच्या तज्ज्ञांनी ही दुरुस्ती केली; मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही मशीन वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
रुग्णांना सिटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात जावे लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद झाल्यास अलिबागमधील खासगी केंद्रासोबत सामंजस्य करार करून गरीब रुग्णांना सिटी स्कॅन चाचणी मोफत पुरवण्याबाबत रुग्ण कल्याण समितीमधून तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी सरकारकडे केली आहे.
*****
गर्भवती महिला, दारिद्र्य रेषेखालील रुग्ण यांच्यासाठी सिटी स्कॅन मशीन रिलायन्स कंपनीने दिली होती. या मशीनसाठी वीजपुरवठा करणाऱ्या स्टॅपीलायझरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. हे बिघाड शोधण्यासाठी कंपनीचे तंत्रज्ञ येत आहेत. ही मशीन केव्हा सुरू होईल, याबद्दल आताच काही सांगता येणार नाही.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक