बांबूची जमीन पिवळीशार...

बांबूची जमीन पिवळीशार...

अमित गवळे, पाली
हंगामी शेतीबरोबरच फळ-फुलझाडे, भाजीपाला लागवड, शेतीला पूरक व्यवसाय वृद्धीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. याशिवाय प्रोत्‍साहन देण्यासाठी सहज कर्ज उपलब्‍ध व्हावे, यासाठी प्रयत्‍नही करण्यात येत आहेत. त्‍यामुळे रायगड जिल्‍ह्यात गेल्‍या तीन-चार वर्षांत पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक प्रयोगशील शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकल प्रवाशांसाठी उपयुक्‍त असलेले एम इंडिकेटर हे ॲप बनलेल्‍या सचिन टेके आणि त्‍यांची पत्‍नी प्रतीक्षा टेके या दाम्‍पत्‍याने सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथे साडेचार एकर क्षेत्रामध्ये कोरोना काळात, २०२० पासून बांबू लागवड केली आहे.

जवळपास १३०० झाडे असून मुख्यत्वे माणगा ही प्रजाती व इतर ३४ अनेकविध प्रजातींचे बांबू टेके यांच्या ‘बांबूविश्व’त आहेत. रायगड जिल्ह्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग असून हे बांबू काढण्यायोग्य झाले असून यातून भरघोस उत्‍पन्न मिळले, असा या दाम्‍पत्‍याला आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीसंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी ‘बांबूविश्व’ येथे नुकतेच निःशुल्क बांबू लागवड परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी बांबू लागवड, उत्पन्न, खर्च, मार्केट, जमीन, हवा-पाणी, बांबूच्या विविध प्रजाती, रोपांची उपलब्धता, फायदे व तोटे यासंदर्भात मार्गदर्शन केले. बांबू लागवडीपासून त्याची निगा, जाती कोणत्या निवडाव्यात, लागवड कशी करावी, जमीन कशा प्रकारची असावी, कीड व रोगांपासून बचाव, मागणी असणारे मार्केट, त्यानुसार जाती, शासनाच्या अनुदानित योजनांची सविस्‍तर माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.

कमी खर्चात उत्‍पन्न अधिक
शेतीतील बहुतांश उत्‍पादने नाशवंत असतात, मात्र बांबू नाशवंत नाही. साठवणुकीवर जास्त खर्च होत नसल्‍याने व्यापाऱ्यांकडून गळचेपीचा प्रश्‍नच येत नाही. दोन वर्षानंतर बांबूला फारशा पाण्याची आवश्यकता भासत नाही. पडीक, वरकस व खडकाळ जमिनीतही बांबू येतो. फळ नसल्याने चोरी होण्याची शक्यता कमी. वादळाने व अवेळी पावसाने नुकसान होत नसल्‍याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बांबू लागवडीकडे वळण्याचे आवाहन टेके यांनी केले आहे.

बांबूच्या जातीची निवड
टेके यांनी ‘माणगा’ जातीच्या बांबूंची निवड केली. हे बांबू भरीव व चिवट असतात. चिवट असल्यामुळे त्‍याचा उपयोग टोपल्या बनवण्याकरिता होतो. व भरीव असल्यामुळे बांधकामाकरिता परांची बांधायलाही होतो. हा माल गुजरात व राजस्थानमध्ये जातो. मार्केटमध्ये बांबूची नेहमीच गरज असते.

लागवडीची पद्धत
बांबूची लागवड करताना कंद वापरल्‍यास लवकर वाढ होते. मात्र १३०० झाडांची लागवड करायची असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात कंद उपलब्ध नसल्‍याने, दरही जवळपास दुप्पट असल्‍याने टेके यांनी रोपांपासून लागवड केली. एप्रिल महिन्यात तीन बाय तीन फुटाचे खड्डे जेसीबीच्या साह्याने खोदून घेतले. मे महिन्यात शेणखत आणून चांगले सुकवले. जूनच्या पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस सुरू झाल्‍यावर बांबूची रोपे आणली. मात्र त्‍यासाठी सहा महिने आधीच, नोव्हेंबरमध्ये बुकिंग केले होते. लागवड करताना, शेणखत व मुंगी पावडर खड्ड्यात टाकले व रोपे लावून खड्डे बुजविले. एक एकरात चारशे रोपांची लागवड करून ठिबक सिंचनद्वारे (ड्रीप इरिगेशनने) पाण्याचे नियोजन केले. लागवडीच्या वर्षी रोपे, खड्डे खोदण्यासाठी मजुरी, रोपे लावण्यासाठी मजुरी, तण काढण्यासाठी मजुरी व खतांसाठी खर्च होतो, त्‍यानंतर मात्र केवळ तण काढण्यासाठी मजुरी व खतांवर खर्च करावा लागतो.

बांबू तोड कधी करावी?
बांबूची पहिली तोड लागवडीनंतर चार वर्षांनी करण्यात येते. साधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या बांबूचीच तोड केली जाते. पावसाळ्यात बांबू तोड करू नये कारण नवीन कोंबांना इजा पोहचण्याची शक्‍यता असते. एका एकरातून वर्षाआड दीड लाख रुपयांचे उत्‍पन्न मिळू शकते. एका बेटातून सात ते दहा काठ्या मिळू शकतात. बांबूचे दर काठीच्या उंची प्रमाणे
बदलतात १२ फुटी, १८ फुटी व २० फुटी अशाप्रमाणे वेगवेगळे दर असतात. बांबू तोड करणारा कॉन्ट्रॅक्टर हा ४० रुपये एका चांगल्या सरळ व जाड काठीचे देतो. पनवेल मार्केटमध्ये एका काठीला ७० रुपये दर सध्या सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com