आरटीईअंतर्गत प्रवेशास १,१९४ विद्यार्थी वंचित

आरटीईअंतर्गत प्रवेशास १,१९४ विद्यार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत सोमवार (ता.२२) संपली. प्रवेशासाठी आलेल्या १० हजार ४९९ अर्जांपैकी ३,७९० अर्ज लॉटरी पद्धतीने निवड झाली होती. मात्र, प्रवेश निश्चितीच्या शेवटच्या दिवसापर्यंत यातील १ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळू शकले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना जादा फी देऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.
आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी रायगड जिल्ह्यातील २६४ खासगी शाळांची नोंदणी झाली आहे. या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, अनुसूचित जाती-जमातीमधील इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ हजार २५६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेश निश्चितीमध्ये पालकांना येणाऱ्या अडचणींमुळे १३ एप्रिलपासून २२ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याची अंतिम मुदत सोमवारी संपली. शेवटच्या दिवसापर्यंत ३,७९० अर्जांपैकी २,५९६ प्रवेश निश्चित झाले आहेत, तर १,१९४ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, अशी माहिती सर्व शिक्षा अभियान कक्षातून देण्यात आली. अर्जांत चुका व गुगल लोकेशन चुकीचे नोंदविल्याने प्रवेशात अडचणी आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवेशाची दुसरी फेरी सुरू करण्यापूर्वी पालकांना अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. प्रामुख्याने कागदपत्रातील उणिवा दूर करणे या पालकांना शक्य न झाल्याने त्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत. आता या पालकांना प्रवेशासाठी जादा प्रवेश फी द्यावी लागणार आहे. चांगले शिक्षण देणाऱ्या खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गातील मुलांना प्रवेश मिळावा, म्हणून शिक्षण हक्क कायदा अमलात आणला, परंतु कागदपत्रांच्या कमतरतेमुळे या वर्गातील मुलांना दर्जेदार शिक्षणापासून मुकावे लागणार आहे.


आरटीई प्रवेशाची सद्यःस्थिती
नोंदणीकृत खासगी शाळा - २६४
आरटीईअंतर्गत राखीव जागा - ४२५६
प्रवेशासाठी आलेले अर्ज- १०४९९
जाहीर लॉटरी सोडत- ३७९०
प्रवेश निश्चिती-२५९६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com