ग्रीन ब्लू प्रकल्पाला अभ्यासगट प्रभावित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रीन ब्लू प्रकल्पाला अभ्यासगट प्रभावित
ग्रीन ब्लू प्रकल्पाला अभ्यासगट प्रभावित

ग्रीन ब्लू प्रकल्पाला अभ्यासगट प्रभावित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : निसर्गाला घातक ठरणारे प्रकल्प न आणता येथील वातावरणाशी संपूर्णपणे सुसंगत आणि शेतकऱ्यांची मालकी असणाऱ्या ग्रीन ब्लू एमआयडीसीचा पहिला प्रकल्प अलिबाग तालुक्यातील शहापूर येथे राबवला जात आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील शेतकरी शहापूर येथे आले होते. ग्रीन ब्लू एमआयडीसी पाहून ते प्रभावित झाले आहेत.
ग्रीन ब्लू एमआयडीसीचा पहिला प्रकल्प पाहण्यासाठी अंकुश कदम, महेश पेडणेकर, राहुल कदम, राजेंद्र कांबळे आणि कोल्हापूर येथून संपत देसाई यांचा अभ्यास गट शहापूर येथे सोमवारी (ता. २२) आले होते. त्यांनी जिताडा तलावांची पाहणी केली. खारजमिनीची निर्मिती समजावून घेतली. ग्रीन ब्लू एमआयडीसी प्रस्ताव राजन भगत यांच्याकडून समजावून घेतला. हा प्रस्ताव संपूर्ण महाराष्ट्रात समजावा म्हणून राजन भगत यांना पुणे येथे ३० मे रोजी आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एमआयडीसीने जमिनी संपादन केल्या आहेत; पण तेथे प्रकल्पच आलेले नाहीत. काही ठिकाणी प्रकल्प बंद पडून जमिनी विनावापर आहेत. याची आकडेवारी श्रमिक मुक्ती दलांनी प्राप्त केल्यानंतर पर्यायी ग्रीन ब्लू एमआयडीसीचा नावीन्यपूर्ण पर्यायी आराखडा २००९ पासूनच आखायला सुरुवात केला. स्थानिक कौशल्य, उपलब्ध नैसर्गिक कच्चा माल आणि सहज विक्रीचे जाळे यावर आधारित उद्योगांची निवड केली. याची सुरुवात महादेव थळे यांनी शहापूरमध्ये केली. त्यानंतर व्यापरी तत्त्वावर पूनम भोईर व डॉ. अमित पाटील यांनी जिताडा व कोलंबी व्यवसाय सुरू केला. आज शहापूरमध्ये २१० जिताडा तलाव आहेत. विशेष म्हणजे कोणतीही शासकीय मदत न घेता येथील शेतकऱ्यांनी ते सुरू केले आहेत.
***
शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यापेक्षा त्यांना उद्योजक करणारी ही संकल्पना आहे. यातून येथील शेतकऱ्यांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. सरकारकडून काही पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. उद्योगामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशा प्रकारच्या उपक्रमातून टाळता येतील. शहापूर येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या ग्रीन ब्लू एमआयडीसीचा अभ्यास करण्यासाठी आता वेगवेगळ्या भातातून शेतकरी येऊ लागले आहेत.
- राजन भगत, जिल्हा समन्वयक श्रमिक मुक्ती दल