रायगड जिल्हा अतिक्रमणमुक्त होणार

रायगड जिल्हा अतिक्रमणमुक्त होणार

पाली, ता. २५ (वार्ताहर) : स्वच्छ शहराबरोबर फक्त सुशोभीकरण नाही, तर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांचे निष्कासनही करणे आवश्यक आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात जिल्ह्यात एकाच दिवशी ‘अस्वच्छ जागांची स्वच्छता अन् अतिक्रमणे हटाव’ अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान शुक्रवारी (ता.२६) जिल्हा नगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी नगरपालिका प्रशासनांना दिले आहेत.
शहर स्वच्छ करण्यासाठी नुसते सुशोभीकरण चालणार नाही, तर त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे दूर झाली होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने शहर व रस्ते स्वच्छ राहतील. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रातील जागा स्वच्छ आणि अतिक्रमणे दूर करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात जिल्ह्यात एकाच दिवशी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी, पोलिस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग; तसेच आवश्यक यंत्रणा यांचा सहभाग करून घ्यावा. जेणेकरून हे अभियान प्रभावीपणे राबवता येईल. अभियानामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे; तसेच आवश्यक साधन सामुग्रीची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

अभियानातील रस्त्यांची माहिती
अलिबाग : येथील बसस्थानकालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक, (रस्त्याचे अंतर ५०० मीटर)
पेण : पेण-खोपोली रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता ते पेट्रोल पंप (रस्त्याचे अंतर ८५० मीटर)
उरण : उरण वैष्णवी हॉटेल ते बोरी नाका (रस्त्याचे अंतर १ किलोमीटर)
रोहा : तहसील कार्यालय, रोहा ते दमखाडी नवरत्न हॉटेलपर्यंतचा रस्ता (रस्त्याचे अंतर १.४ किलोमीटर)
मुरूड-जंजिरा : मुरूड एकदरा पूल ते तवसाळकर पकटी (रस्त्याचे अंतर ४०० मीटर)
महाड : पिंपळपार ते भगवानदास बेकरी (रस्त्याचे अंतर ४५० मीटर)
श्रीवर्धन : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाजी मार्केट (रस्त्याचे अंतर ३५० मीटर)
कर्जत : श्रद्धा हॉटेल ते चार फाटा रस्ता (रस्त्याचे अंतर ५०० मीटर)
खालापूर : महड येथील वरद विनायक मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण (रस्त्याचे अंतर ५०० मीटर)
पोलादपूर : शेतकरी बाजार ते गांधी चौक परिसर (रस्त्याचे अंतर ५०० मीटर)
म्हसळा : मुख्य रस्ता श्रीवर्धन-गोरेगाव रोड (रस्त्याचे अंतर ५०० मीटर)
तळा : मंदाड रोड ते चंडिका मंदिर रोड, सोनार आळी ते मुंढे वाडी रोड (रस्त्याचे अंतर १ किलोमीटर)
माणगाव : कचेरी रोड ते वाकडाईदेवी मंदिर परिसर (रस्त्याचे अंतर १.६ किलोमीटर)
पाली : गांधी चौक ते एसटी बस डेपो (रस्त्याचे अंतर ७०० मीटर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com