
मृगगडावर पाण्यासाठी श्रमदान
अमित गवळे, पाली
सुधागड तालुक्यातील मृगगडच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी संस्था कार्यरत आहेत. गडावरील पाणीसमस्या सोडवण्यासाठी नुकतीच दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे श्रमदान मोहीम राबवण्यात आली. यावेळी पाण्याचे मोठे टाक्याची साफसफाई करण्यात आली असून झाडी-झुडपे, गवत तोडून दगड, गोडे बाजूला करून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या टाक्यात पाणी साठून गडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
कोकणात येणाऱ्या शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी शिवरायांना सुधागड तालुक्यात मृगगड किल्ला महत्त्वाचा वाटला. अनेक वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यावर संवर्धनाचे कार्य करते. मृगगड किल्ल्यावरही दुर्गवीरांचे संवर्धनाचे काम सुरू आहे. आजवर गडावरील अनेक वास्तू संवर्धनातून उजेडात आल्या आहेत. अनेक वास्तूंची निगा राखली जात आहे. गडावरील पाण्याच्या टाक्याचे काम सातत्याने सुरू आहे. अनेक मोहिमा झाल्या, पण या टाक्याचा तळ गाठला गेला नव्हता, मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्याआधी टाके पूर्ण स्वच्छ करण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानचा मानस आहे. मोहिमेत एकनाथ अस्वले, धनाजी अहिरे, विशाल इंगळे, सोना सावंत, रुपाली अवघडे, कुणाल ताकवले, स्वरंगी कुंभार, हेमंत जामकर, आदित्य कदम, प्रमोद डोंगरे, निखिल वाकर, विशाल साळुंखे, प्रतीक पाटेकर आदी दुर्गवीर उपस्थित होते.
खूप वर्षांच्या मेहनतीने दुर्गवीरांनी गडावरील सुंदर असे पाण्याचा मुख्य स्तोत्र असलेले बांधीव टाके संपूर्ण गाळ काढून स्वच्छ केले असून आता अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. टाक्यात पाणी साचून गडावर दुर्गप्रेमींचा पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास आहे.
- एकनाथ अस्वले, मृगगड मोहीम प्रमुख, दुर्गवीर प्रतिष्ठान
पाली ः मृगगडावरील पाण्याचे टाक्याची साफसफाई करण्यात आली.