गावागावांत पाणी प्रकल्‍पासाठी सौरऊर्जेचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावांत पाणी प्रकल्‍पासाठी सौरऊर्जेचा वापर
गावागावांत पाणी प्रकल्‍पासाठी सौरऊर्जेचा वापर

गावागावांत पाणी प्रकल्‍पासाठी सौरऊर्जेचा वापर

sakal_logo
By

पाली, ता. ३० (वार्ताहर) ः जिल्ह्यातील विविध गावांत स्वदेस फाउंडेशनच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसाला १८०० किलो वॅट ऊर्जा तयार होत आहे. त्यामुळे दरदिवशी १,४५८ किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी होत असून वर्षाला ३०६ मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे.
रायगड व नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणासाठी रॉनी व झरिना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकल्‍प सुरू करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई दूर होण्यासाठी गाव विकास समितीच्या माध्यमातून माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड तालुक्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत. पाणी प्रकल्पातील वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सर्व पाणी प्रकल्प सौर ऊर्जेवर आधारित तयार केले आहेत. आतापर्यंत ३५० पाणी योजना सौरऊर्जेवर आधारित आहेत. त्‍यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे.
‘शेतीसाठी पाणी’ प्रकल्पाअंतर्गत वीजबिल आणि इंधन खर्च कमी करण्यासाठी आतापर्यंत १४२ सौर पंप शेतकऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक शेतीसाठी देण्यात आले आहेत. तसेच २९ अंगणवाडी व ६३ प्राथमिक शाळा व ७ माध्यमिक शाळांसाठी सौर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून शाळेमधील विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होत आहे.

कार्बन उत्सर्जनात घट
स्वदेस फाउंडेशनच्या विविध सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज १,८०० किलो वॅट सौर ऊर्जा तयार होत आहे व प्रत्येक दिवसाला १,४५८ किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. वर्षभरातील कार्बन उत्‍सर्जनात ३०६ मेट्रिक टनची घट झाली आहे. सौर प्रकल्‍पामुळे अनेक गावांमध्ये वीज बिलाचीही बचत होत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती गाव विकास समिती करत असल्यामुळे सर्व सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहेत.

सौरऊर्जा दिवे
स्वदेस फाउंडेशनच्या वतीने स्वप्नातील गाव हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत घरोघरी सौर दिवे व गावामध्ये सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत. आतापर्यंत ६,४६८ घरांमध्ये सौर दिवे देण्यात आले आहेत. तसेच १०६ गावांमध्ये १,४४५ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीच्यावेळी ८० गावांमध्ये १४५ घरघुती सौर दिवे देण्यात आली आहेत.

स्वप्नातील गावांमधील अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर वाढत आहे. त्याच बरोबर १० लाखांच्या वर झाडे स्वदेस फाउंडेशन काम करत असलेल्या गावांमध्ये लावल्यामुळे भविष्यात ही गावे वाढते तापमान नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर करतील.
- मंगेश वांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्‍वदेश फाउंडेशन