
वाहतूक कोंडीचा पर्यटनावर परिणाम!
पाली, ता. ३० (वार्ताहर) ः डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल २४० किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण, ऐतिहासिक वारसा असलेले गडकिल्ले आणि धार्मिकस्थळांमुळे रायगड जिल्हा पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरला आहे. राज्याबरोबरच देश-विदेशातील नागरिक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक वर्षभर लाखोंच्या संख्येने दाखल होतात. यंदाही बहुतांश पर्यटनस्थळे बहरली आहेत.
मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
उन्हाळी सुट्यांमुळे पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटकांची पावले जिल्ह्याकडे वळली आहेत. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. मात्र खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे तासन्तास खोळंबून राहवे लागत असल्याने पर्यटक पुरते हैराण झाले आहेत.
इच्छितस्थळी पोहचण्यासही विलंब होत असल्याने अनेकांचे नियोजन कोलमडते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह राज्य व अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यातील खडी, दगड रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी कामासाठी वापरण्यात येणारी खडी, रेती रस्त्यावर आल्याने वाहनचालवताना चालकांना कसरात करावी लागते. त्यामुळे पर्यटन स्थळांबाबत आकर्षण असले तरी अनेकांना जिल्ह्यातील प्रवास नकोसा होत असून त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे.
पनवेल, पेण, अलिबाग, खोपोली, पाली, माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच असते. जिल्ह्यातील अलिबाग- नागाव, आक्षी, रेवस, वरसोली, मुरूड-काशीद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर, आदगाव येथील समुद्रकिनारे पर्यटकांची आकर्षण केंद्र आहेत. मात्र येथील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. एखादे अवजड वाहन असल्यास किंवा रस्त्यालगत वाहने उभी केल्यास वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो.
शिवप्रेमींचाही प्रवास खडतर
मुंबई गोवा महामार्गावरील संथ व अपूर्ण कामामुळे शिवप्रेमींना रायगड किल्ल्यावर पोहचण्यास अडथळे येतात. याबरोबरच वडखळ, पेण, रामवाडी, इंदापूर, कोलाड व लोणेरे आदी ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागते. दक्षिण कोकणातील तसेच पुण्यामुंबईतील पर्यटकांना मुरूड-जंजिरा आणि कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जावे लागते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटक पुरते हैराण होतात.
जिल्ह्यातील महामार्ग, राज्यमार्गांची रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. अंतर्गत रस्ते रुंद करणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणे, वाहतूक पोलिस तैनात ठेवणे, बायपास मार्गांचा पर्याय देणे, आवश्यक तेथे अवजड वाहतूक बंद करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच पर्यटकांचा ओघ वाढेल आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.
- रवींद्रनाथ ओव्हाळ, जिल्हा सचिव रिपाइं