
वन्यप्राण्यांच्या बचावासाठी अॅम्ब्युलन्स
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : रायगड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या बचावासाठी पुरवण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे वर्षभरात अनेक वन्यजीवांचे प्रमाण वाचवण्यात मदत झाली आहे. सागरी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक वन्यजीव रुग्णवाहिका पुरविली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे. त्यामुळे वन्य जीवांसाठी वापरण्यात येणारी रुग्णवाहिका अनेक जिवांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरते आहे.
निसर्ग संपन्नतेने समृद्ध असलेल्या कोकणात हिंस्र व इतर वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या संख्येने आढळतो. अनेकदा तहान-भूक भागवण्यासाठी हे प्राणी लोकवस्तीत येतात. त्यामुळे अनेकदा भयग्रस्त नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्राण्यांवर हल्ला करतात. तर काही वेळ माणसांच्या हल्ल्यामुळे चेकाळलेले प्राणी प्रतिहल्ला करतात. यात अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात. संकटात सापडलेल्या अथवा लोकवस्तीत शिरलेल्या वन्य प्राण्यांचा बचाव करून त्यांना सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्याचे काम सध्या खासगी वाहनाने केले जाते. खासगी वाहनाची रचना आणि त्यामध्ये पिंजरा ठेवताना फार अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत वन्यजीवांसाठी रुग्णवाहिका फायदेशीर ठरत आहे.
वनविभागाच्या खारफुटी व सागरी जैव विविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून सागरी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक वन्यजीव रुग्णवाहिका पुरविली आहे. त्यामुळे अनेक वन्यप्राण्यांचे जीव वाचवण्यात आले आहेत.
वन्यजीवांना वाचवण्यासाठी तत्काळ मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरत आहे. यात प्राथमिक उपचाराची सुविधा आहेत. या रुग्णवाहिकेतून वन्यजीवांना वाचवण्यात यश आले आहे.
- नरेश पाटील, वनक्षेत्रपाल, अलिबाग