पर्यावरण दिनी कांदळवनांचे रोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण दिनी कांदळवनांचे रोपण
पर्यावरण दिनी कांदळवनांचे रोपण

पर्यावरण दिनी कांदळवनांचे रोपण

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
राज्‍यातील कांदळवनांपैकी सर्वाधिक, एकूण १२० चौरस किमीहून अधिक क्षेत्र रायगड जिल्ह्यात आहे. किनारी प्रदेशातील जीवन आणि स्थानिकांच्या उपजीविकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धनाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य देत मॅन्ग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिटॅट्स अँड टॅनजिबल इनकम (मिष्टी-MISHTI) ही योजना ५ जून जागतिक पर्यावरण दिनापासून राबवण्याचे नियोजले आहे. मिष्टी योजना देशातील ९ किनारी राज्य व ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि म्हसळा तालुक्यांतून एकूण ४ ठिकाणांचा समावेश
देशातील एकूण ७५ स्थळांवर, त्‍यात महाराष्ट्रातील १५ ठिकाणी कांदळवन रोपण केले जाणार आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात वाघ्रण, पालव आणि म्हसळा तालुक्यात वारळ येथील दोन असे एकूण ४ ठिकाणांचा समावेश आहे.
रोहा वनविभागातील म्हसळा वनपरिक्षेत्रात मौजे वारळ येथील ०.५ हेक्टर क्षेत्रात एकूण ५०० रोपे व ०.६१ हेक्टर क्षेत्रात एकूण ६१० रोपांची लागवड होणार आहे. त्यात प्राथमिक स्वरूपात प्रत्येय ठिकाणी २०० रोपांची लागवड करण्यात येईल. रोहा उप वनसंरक्षक आप्पासाहेब निकत व सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, म्हसळा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे वारळ येथील एका क्षेत्रात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते तसेच दुसऱ्या क्षेत्रात आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सोमवारी, पर्यावरण दिनाच्या औचित्याने सकाळी १० वाजता कांदळवन रोपवन प्रारंभ करण्यात येणार आहे.

अलिबाग वनविभागातील वाघ्राण येथील ६ हेक्टर क्षेत्रात व पालव नागाव येथे ७ हेक्टर क्षेत्रात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व स्थानिक आमदार महेंद्र दळवी, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते अलिबाग उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, व सहायक वनसंरक्षक नरेंद्र पाटील व कांदळवन कक्ष अलिबाग रायगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनात रोपण करण्यात येणार आहे.

पुनर्वसन व उपजीविका
मिष्‍टी योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्वसन होऊन स्थानिकांना नवीन उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. तसेच निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. प्राथमिक स्वरूपात प्रत्येक ठिकाणी २०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
- समीर शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकार, कांदळवन क्षेत्र, अलिबाग