
जिल्हा रुग्णालयाची पुन्हा मलमपट्टी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून पुन्हा मलमपट्टी करण्यात येत आहे. गंजलेले स्टील, पिलर्सचा कमकुवत भाग काढून त्याची दुरुस्ती होत असताना रुग्ण व नातेवाइकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते.
इमारतीच्या दुरुस्तीसाठी दर्शनी भागातील धोकादायक पाया खोदण्यात आला आहे. त्यामध्ये मजबुतीसाठी पुन्हा सिमेंट काँक्रिटने भरण्याचा प्रयत्न आहे; मात्र, त्यासाठी कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. आधीच इमारत धोकादायक स्थितीत असताना पाया खोदल्याने ती अधिकच कमकुवत झाली आहे. काम सुरू असल्याने मातीच्या ढिगाऱ्यावरूनच रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी ये-जा करीत आहेत. रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारणे अपेक्षित असताना जुनी व जीर्ण इमारतीला मलमपट्टी करण्यात येत असल्याने दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
तीन वर्षापूर्वीच इमारतीची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्ती पूर्ण नाही तोच पुन्हा भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रुग्णालय परिसर, भिंती व खिडक्यांवर गवत-झुडपे वाढले आहे. गटारे खुली असल्याने दुर्गंधी पसरत असून कर्मचाऱ्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रुग्णालयाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे.
सर्वसामान्य कुटुंबाला योग्य उपचार मिळावे, म्हणून जिल्हा रुग्णालयाचा आधार वाटतो. ही रुग्णालये अत्याधुनिक व सोयी-सुविधांयुक्त असणे अपेक्षित आहे, मात्र कधी मनुष्यबळाचा अभाव तर कधी कमकुवत इमारतीमुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे.
खासगी रुग्णालयामध्ये जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून नाइलाजाने सरकारी रुग्णालयात येतो. मात्र इथे भीतीच्या छायेत उपचार घ्यावे लागतात. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे गेल्या सात वर्षांपासून दुरुस्तीचेच काम सुरू आहे, अद्याप ते संपलेले नाही. कधी अंतर्गत दुरुस्ती, तर कधी रॅम्पची दुरुस्ती, अशी सतत दुरुस्ती चालू असते. जीर्ण व कमकुवत झालेली ही इमारत पाडून नवीन सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारत बांधण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- जगदीश पाटील, रुग्ण नातेवाईक
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिधोकादायक असल्याची नोंद आहे. जीर्ण, जुनी इमारत पाडून नव्याने बांधण्यात यावी, ही आमची मागणी आहे. रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावास मंजुरी मिळेल.
- आ. महेंद्र दळवी, अलिबाग-मुरूड विधानसभा
समुद्राच्या खाऱ्या पाण्याने इमारतीच्या पायाचे स्टील आणि सिमेंट खराब झाले आहे. ते काढून स्टीलचे जादा तुकडे वापरण्यात येत आहेत. दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला अशा पद्धतीच्या कामाचा अनुभव असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष आहे. दुरुस्तीसाठी साधारण सव्वा कोटी रुपये खर्च केला जात आहे.
- राजीव डोंगरे, उपअभियंता, अलिबाग, सार्वजनिक बांधकाम