आरोग्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक घडी कोलमडली
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या अद्याप संपलेली नाही. वेळेवर वेतन मिळत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांना पडला असून संतापाचे वातावरण आहे.
आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्यसेवक-सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक, स्त्री परिचर, सफाई कामगार, शिपाई व इतर कर्मचारी यांचे वेतन मागील काही महिन्यांपासून वेळेत होत नाही. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वीच एक पत्र सर्व जिल्हा परिषदांना जारी केले आहे. दरमहा ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे, अशा राज्य सरकारच्या सूचना असतानाही वेतन वेळेत होत नाही. ऑनलाइन प्रणालीवर सिबिल स्कोअरवरही याचा परिणाम होत असून तो खराब होत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. कोणत्याही बॅंकेत काहीही चूक नसताना कर्मचारीवर्गाला नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कर्जप्रकरणे मंजूर होताना अडचणी येत आहेत.
वेतनाला सातत्याने विलंब होत असल्याने गृहकर्ज, मुलांचे शिक्षण, घरभाडे, कुटुंबीयांचे औषधोपचार, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना पैसे पाठविता न येणे आदी बाबी रखडत असल्याने कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
कर्मचारी संघटनेकडून निवेदन
सरकारकडून वेतनासाठी वेळेत निधी उपलब्ध होतो. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेतन वेळेवर अदा करण्याच्या सूचना वारंवार दिल्या आहेत, तरीसुद्धा या महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत झालेले नाही. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे वेतनास विलंब होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. वेतनास विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच यापुढील वेतनास कोणताही विलंब होणार नाही, असे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन निवेदनही देण्यात आले आहे.
वेळेवर वेतन मिळत नसल्याने मुलांची फी, घराचे हप्ते, घर खर्च भागवता येत नाही. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना देऊनही दिरंगाई केली जाते; मात्र त्याचा मनस्ताप सामान्य कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागतो. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाईबद्दल कारवाई व्हायला हवी.
- अमोल खैरनार, अध्यक्ष, रायगड जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.