परराज्यातून परतले हजारो कामगार
परराज्यातून परतले हजारो कामगार
मासेमारी हंगामाची लगबग; नव्याने येणाऱ्यांसाठी नोंदणी आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० ः मासेमारी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होत असून यासाठी जवळपास २५ हजार पुरुष कामगार उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून दाखल होणार आहेत. तर मासळी वेगळी करणे, ती सुकत घालणे यांसारख्या कामासाठी साधारण पाच हजार महिला कामगार काही दिवसांतच जिल्ह्यात दाखल होतील. जे कामगार पहिल्यांदाच येत असून त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची नोंदणी करूनच कामावर घेण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. त्यामुळे सध्या बंदरात मासेमारीसाठी दाखल होत असलेल्या कामगारांची लगबग दिसून येत आहे.
समुद्र अजूनही खवळलेला आहे, उंच उंच लाटांचा मारा अद्याप कायम असल्याने मच्छीमार समुद्र शांत होण्याची वाट पाहत आहेत. यामुळे १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात करता येणे शक्य नाही, असे जिल्ह्यातील मच्छीमारांचे म्हणणे आहे. दरम्यान, गावाकडे गेलेले कामगार बंदरात परतू लागले आहेत. यामुळे बंदरात वर्दळ सुरू झाली आहे. यातील काही कामगार दरवर्षी कोकणात येतात, त्यांच्या काम करण्याच्या होड्या ठरलेल्या असतात; परंतु काही नव्याने येत असल्याने त्यांची बायोमॅट्रिक ओळख पटण्यासाठी आधार कार्ड, बॅंकेचे पासबुक, फोटो आणि ज्या गावातून आले आहेत तेथील रहिवासी दाखला मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग आणि संबंधित मच्छीमारी सोसायटीकडे द्यावे लागणार आहे. अलीकडे सागरी सुरक्षेला अधिक महत्त्व दिले जात असल्याने मच्छीमारांच्या सुरक्षेलाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे दररोज कोणत्या बोटीवरून किती मच्छीमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेले आहेत, याची माहिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये समुद्रात किती मच्छीमार आहेत, याची माहिती बचाव पथकाला तत्काळ समजते, त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून लगेचच बंदरात बोलावणे शक्य होते. यासाठी स्थानिक कामगारांसह परप्रांतीय कामगारांची बायोमॅट्रिक माहिती संकलित केली जात आहे.
गंगेतील मच्छीमारांचे समुद्रावर वर्चस्व
मुंबई, रायगड जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्यांसाठी येणारे कामगार हे गंगा नदीच्या पात्रात पिढीजात मासेमारी करणारे आहेत. तेथे गोड्या पाण्यात मासेमारी करताना फारसा फायदा होत नसल्याने ५० वर्षांपूर्वी तेथील काही तरुण रोजगारासाठी मुंबईतील ससून डॉकमध्ये कामाला आले. काही दिवसांतच त्यांनी मुंबईतील मासेमारी आणि विक्री व्यवसायावर ताबा मिळवला. त्यानंतर करंजा, मोरा आणि आता साखर, आक्षी, वरसोली बंदरातही आपले पाय घट्ट रोवले आहेत. एका हंगामासाठी साधारण ३० हजार कामगार हे गंगेच्या किनाऱ्यावरून रायगड जिल्ह्यात मासेमारी करण्यासाठी येत असून त्यांच्याशिवाय येथील मासेमारी व्यवसाय सुरू ठेवणे शक्यच नसल्याचे गिरीधर नाखवा या मच्छीमाराचे म्हणणे आहे.
मजुरीवर सर्वाधिक खर्च
ज्याला मासेमारीचा अनुभव आहे, त्या नाखवाला दिवसाला किमान १,५०० रुपये पगार द्यावा लागतो, तर जाळी ओढणे यांसारख्या इतर कामांसाठी लागणाऱ्या कामगारांना दिवसाला एक हजार रुपये पगार बोट मालक देतो. या कामगारांचा जेवणाचा खर्चही बोट मालकालाच करावा लागतो. डोली मासेमारी १२ ते १५ सागरी मैल हद्दीत करताना आकाराने थोड्याशी लहान असलेल्या या होडीवर किमान पाच कामगार लागतात. तर पर्सनेट मासेमारीची होडी थोडी मोठ्या आकाराची असते. पर्सनेट मासेमारी १५ सागरी मैलाच्या पलीकडे करतात. पर्सनेट मासेमारीसाठी साधारण आठ कामगार लागतात, तर एलईडी मासेमारीसाठी किमान १५ कामगारांची गरज असते. या मोठ्या होड्या समुद्रात गेल्यानंतर एक-दोन आठवडे परत येतच नाहीत. दरम्यानच्या मजुरांचा खर्च, त्यांचा पगार आणि होडीच्या इंधनाचा खर्च बोट मालकाच्या माथी पडतो. इतका खर्च करूनही मासळी मिळाली नाही तर कामगारांचे काहीही नुकसान होत नाही; परंतु मालकाला सर्व खर्च सोसावा लागतो.
पहिल्या फेरीसाठी तयारी
खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका फेरीसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात. मासेमारीच्या एका फेरीसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च मच्छीमारांना येतो. ५० वाव खोल समुद्रात मच्छीमारी केली जाते. खोल समुद्रातील मासेमारीसाठी १५ दिवस आधीपासून तयारी सुरू झाली आहे. बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.
यंदाचा मासेमारी हंगाम लांबणीवर
दरवर्षी १ जुनपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू होतो; परंतु यंदा मॉन्सूनपूर्व पावसामुळे मच्छीमारांना १० दिवस आधीच नौका बंदरात नांगरून ठेवाव्या लागल्या. दोन महिन्यांचा बंदी कालावधी ३१ जुलै रोजी संपतो; परंतु समुद्र अद्याप शांत झालेला नसल्याने मासेमारीला जाता येणार नसल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. कोकणातील मच्छीमार साधारणपणे नारळी पौर्णिमेपासून मासेमारीला सुरुवात करतात; मात्र मागील काही वर्षांपासून वाढलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे बंदी कालावधी संपताच मासेमारीला जाण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी परप्रांतीय कामगार बंदरात परत येण्यास सुरुवात झाली आहे. या कामगारांकडून नौकांची डागडुजी, रंगरंगोटी, जाळी विणणे अशी कामे करून घेतली जात आहेत.
१ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी होडीवर काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. हे त्या कामगारांसाठी आणि होडी मालकांसाठीही आवश्यक असून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. या कामगारांची माहिती बंदर विभागाकडेही असणे आवश्यक आहे.
- संजय पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग
कामगारांना सांभाळणे खूप कठीण आहे, आपल्याकडचे तरुण होड्यांवर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे होड्या असूनही मासेमारी करता येत नसल्याने मोठे नुकसान होते. यासाठी दुसऱ्या राज्यातील कामगार अधिक सोयीचे ठरतात. मे महिन्यात गावाला जाताना ते पुन्हा तुमच्याच होडीवर काम करण्यासाठी येणार असल्याची हमी देण्यासाठी बयाणा घेऊन जातात. नव्या हंगामात आल्यानंतर त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करावी लागते.
- योगेश बणा, मच्छीमार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.