पाली–खोपोली राज्यमहामार्ग दुरवस्थेत

पाली–खोपोली राज्यमहामार्ग दुरवस्थेत

Published on

पाली-खोपोली राज्यमार्ग दुरवस्थेत
सुधागड मनसेचा मुंबईतील अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; आंदोलनाचा इशारा
पाली, ता. २ (वार्ताहर) ः पाली-खोपोली राज्यमार्गावरील दुरवस्थेला कंटाळून सुधागड तालुका मनसेने थेट मुंबईतील एमएसआरडीसी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा खळ्ळखट्याक आंदोलन अटळ, असा इशारा दिला आहे.
अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण पूर्ण झालेल्या वाकण-पाली-खोपोली राज्यमार्गावर आता मोठाले खड्डे पडले असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सततच्या दुर्लक्षामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याआधी मनसेने खड्ड्यांमध्ये होड्या सोडून अनोखे आंदोलन केले होते, तसेच संघर्ष ग्रुपनेही आवाज उठवला होता, मात्र प्रशासनाने फक्त तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून जबाबदारी झटकली. परिणामी, पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढल्याने प्रवाशांचा संताप उफाळला आहे. एमएसआरडीसी अजून किती अपघातांची वाट बघणार? अनेक जण जखमी, अनेकांचा मृत्यू झाला, तरी अधिकारी डोळेझाक करत आहेत. लवकर ठोस उपाय न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सुनील साठे यांनी दिला आहे.
................
येथे आहेत खड्डे
पाली मिनिडोअर स्थानक, देवन्हावे, मिरकुटवाडी, इमॅजिका, उंबरे, गोंदाव फाटा, दुधाने वाडी, वऱ्हाड, जांभुळपाडा प्रवेशद्वार, रासळ, पाली, जंगली पीर, वझरोली, बलाप व राबगाव या गावांजवळ रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या मार्गावर दर आठवड्याला लहानमोठे अपघात घडत असून, काही नागरिकांना अपंगत्व आले आहे.
..............
खर्च वाया!
राज्यमार्ग क्रमांक ५४८ (अ) एकूण ३९ किमी लांबीचा असून, २०१६ पासून सुरू असलेले काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या कामासाठी शासनाने तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले, मात्र इतक्या खर्चानंतरही रस्ता पुन्हा दुरवस्थेत आल्याने नागरिक संतप्त आहेत आणि कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
..............
जोडतो पण त्रास देतो
हा मार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, दक्षिण कोकणातून पुणे-मुंबईकडे जाणारे प्रवासी व वाहने याच मार्गावरून जातात. दिवाळीनंतर मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या कोकणकरांसाठी हा रस्ता प्रमुख आहे, मात्र सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास जीवघेणा बनला असून, नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करत आहेत. एकंदरीत, २०० कोटी खर्चून तयार झालेला हा महामार्ग पुन्हा खड्डेमय बनला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर आता एमएसआरडीसी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com