रायगड जिल्ह्यात थंडीची चाहूल
रायगड जिल्ह्यात थंडीची चाहूल
आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटनवाढीस चालना
पाली, ता. १२ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात यंदाचा ऑक्टोबर महिना नेहमीपेक्षा वेगळा ठरत आहे. साधारणपणे या काळात उकाडा असह्य होतो आणि ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास सर्वांनाच भेडसावतो. यंदा मात्र परतीच्या पावसाने हवेत गारवा आणल्याने उकाड्याची चाहूलच लागली नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सकाळी व रात्री हलका गारवा जाणवत असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वातावरण अल्हाददायक झाले असून, पर्यटक आणि प्रवासी दोघेही या बदलाचा मनमुराद आनंद घेत आहेत.
जिल्ह्यात पहाटेपासूनच सर्वत्र दाट धुक्याची दुलई पसरते. या धुक्यामुळे महामार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असली तरी परिसरातील दृश्ये नयनरम्य बनली आहेत. डोंगर, कडे, दऱ्या आणि हिरव्या झाडांच्या फांद्यांवर दवबिंदू चमकत असल्याने वातावरण जणू एखाद्या निसर्गचित्रासारखे दिसते. विशेषतः ताम्हिणी घाट, वरंधा घाट आणि मोर्बे घाटातून प्रवास करताना ढगांच्या चादरीतून जाण्याचा अनुभव पर्यटकांना मोहवून टाकतो. रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड आणि कर्नाळा यांसारख्या दुर्गम किल्ल्यांवर ढगांची दाटी आणि धुक्याची चादर पसरलेली असते. त्यामुळे ट्रेकर्स, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. ताजे, प्रफुल्लित आणि मन:शांती देणारे हे वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत असून, स्थानिक पर्यटन उद्योगालाही चालना मिळत आहे.
................
प्रवासी व पर्यटकांना धुक्याचा आनंद
मुंबई-गोवा आणि मुंबई-बंगळुरू हे दोन राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जिल्ह्यातून जात असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र दाट धुक्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येते. धुक्यामुळे सकाळचे वातावरण अत्यंत आल्हाददायक झाले आहे. सकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणारे स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघेही धुक्यात हरवून जात आहेत. ताम्हिणी घाटातील ढग आणि हिरवळ पर्यटकांना मोहवून टाकत आहेत.
.................
नदी, ओहोळ, डोंगरावरील जलधारा
परतीचा पाऊस नुकताच थांबल्याने जिल्ह्यातील नद्या, ओहोळ आणि धबधबे अजूनही पाण्याने ओथंबून वाहत आहेत. डोंगरांवरून वाहणाऱ्या जलधारांचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. स्थानिक नागरिकदेखील या पाण्यात डुंबून निसर्गाचा आनंद घेत आहेत. रात्रीचे तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्याने अनेक ठिकाणी लोक शेकोट्या पेटवून थंडीचा आनंद घेत आहेत. गावागावात रात्रीच्या वेळी गप्पा, चहा आणि शेकोट्या हे एक वेगळेच आकर्षण ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

