पुरंदरवर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरवर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंती सोहळा
पुरंदरवर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंती सोहळा

पुरंदरवर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंती सोहळा

sakal_logo
By

गराडे, ता. १४ : छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळ असलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे ३०० कोटी रुपयांचा आराखडा बनवण्यात आला आहे. संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी हे स्मारक उभे राहणार आहे. या माध्यमातून संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर आला पाहिजे, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येत आहे.

किल्ले पुरंदरवरील सभागृहात शनिवारी (ता. १४) संभाजी महाराज जयंती सोहळा साजरा करण्यात आला. पंचायत समिती, संभाजी ब्रिगेड व पुरंदर प्रतिष्ठान यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची ढोल पथकासह मिरवणूक झाली. या वेळी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी हजेरी लावली. तसेच, विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी छत्रपती युवराज शहाजीराजे भोसले, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप, रोहित पवार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विश्वजीत कदम म्हणाले, की पुरंदर प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेड या संस्था विचारांचा जागर करण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पोचविण्याचे कामदेखील या सामाजिक संस्था करत असतात. रोहित पवार म्हणाले, गड-किल्ल्यांचे जतन झाले पाहिजे. इतिहास हा इतिहास असतो, इतिहास बदलता येत नाही. काही संघटना खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. संभाजी महाराजांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. शिवतारे म्हणाले, महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. संभाजी महाराज अजून काही वर्षे जगले असते, तर या महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल बदलला असता. छत्रपती युवराज शहाजीराजे भोसले म्हणाले की, तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यातून महाराष्ट्राची अस्मिता जतन करण्याचे काम होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Grd22b02814 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top