
तिन्ही नाल्यांच्या सफाईत अडथळे
खोपोली, ता. १ (बातमीदार) ः खोपोलीत मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू आहे, मात्र शहरातील मुख्य नाल्यांत मातीचा भराव आणि अतिक्रमणे झाली असल्याने सफाईत अडथळे येत असून त्यामुळे शहाराला पुराची भीती आहे.
दरवर्षाप्रमाणे याही वर्षी खोपोली नगरपालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. नाले व गटारी सफाईची कामे प्रभागनिहाय सुरू असून सर्व कामे १० जूनपूर्वी पूर्ण होतील, असे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे. यासाठी कंत्राटी कामगारांची विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे. चार सुपरवायझर, एक आरोग्य निरीक्षक नेमला आहे. जेसीबी, मलनिःसारण गाडी या कामी वापरण्यात येत आहे. मात्र शहरातील तिन्ही मुख्य नाल्यांत झालेली अतिक्रमणे व करण्यात आलेला अतिरिक्त माती भराव नालेसफाई मोहिमेत अडथळा ठरत असून यामुळे आगामी पावसाळ्यात पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहरातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खोपोली नगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अनुप दुरे पाटील यांनी सांगितले. रहिवासी भागातील भूमिगत व उघडी गटारे, तसेच नौसार्गिक नाले यांची सफाई १० जूनपूर्वी होणार आहे. शहरात मोगालावाडी ते हायको कॉर्नर या भागातील सर्व रहिवासी भागांना जोडणारा मोठा नैसर्गिक नाला आहे. या नाल्याला जागोजागी अनेक गटारे व लहान नाले जोडले आहेत. पावसाळ्यात सह्याद्री डोंगररांगातून कोसळणारे सर्व पाणी याच नाल्याच्या मार्गाने पुढे पाताळगंगा नदीत जाते. मात्र मागील काही वर्षांत नाल्याला लागून मोठ्या प्रमाणावर माती भराव व रहिवासी घरे, मोठमोठी संकुले उभी राहत आहेत. यात काही अधिकृत, तर अनेक बांधकामे अनधिकृत व अतिक्रमित आहेत. यामुळे नाल्याची नैसर्गिक रुंदी पन्नास टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. अशीच स्थिती अन्य दोन्ही मुख्य नैसर्गिक नाल्यांची बनली आहे.
दरम्यान, नाल्यात झालेली अतिक्रमणे व अतिरिक्त माती भराव नगरपालिकेने काढण्याची मागणी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी करूनही पालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
...
या भागांना धोका
अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने दर वर्षी वीणानगर, कृष्णानगर, शास्त्रीनगरमधील मोठा रहिवासी भाग, तसेच खालची खोपोली, शीळफाटा येथील मोठ्या वस्तींत पाणी भरून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. अतिक्रमणे व माती भराव कमी होण्याऐवजी वाढ झाली असल्याने या वर्षी पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
...
शहरातील सर्व गटारे व नाले यांची साफसफाईची कामे पूर्ण करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. कोणताही रहिवासी भाग या मोहिमेतून सुटणार नाही याची खात्री करण्यात येईल. नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणे व माती भरावाबाबत अहवाल बनवून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- अनुप पाटील, मुख्याधिकारी, खोपोली, नगरपालिका
...
मागील वर्षी अतिवृष्टी काळात वीणानगरमधील अनेक बैठी घरे व इमारतीच्या तळ मजल्यावरील घरांत गुडघाभर पाणी भरले होते. यात प्रचंड आर्थिक नुकसान झाले. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
- नरेंद्र हर्डीकर, वीणानगरमधील रहिवासी
....
Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05687 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..